मुंबई : आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांची बहुचर्चित जोडी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. निमित्त आहे त्यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या नवीन गाण्याचे! मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक दादा कोंडके यांच्या एका अजरामर गाण्याला आधुनिक संगीताचा ट्विस्ट देऊन बनवलेले हे रिमेक गाणे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात ट्रेंड होत असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गौतमी आणि भाऊ कदम यांची ही नवी आणि अनोखी जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली असून, रिलीज होताच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. भारताच्या ऑफिशियल युट्यूब ट्रेंडिंग लिस्टमध्ये हे गाणे सध्या २४ व्या क्रमांकावर झळकत आहे. सोशल मीडियावरील चर्चा आणि रील्सच्या माध्यमातून ही जोडी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. आता तब्बल ५२ वर्षांनंतर या सदाबहार गाण्याला आधुनिक संगीत आणि नव्या सादरीकरणाची जोड देत त्याचे रिमेक व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. विशेष म्हणजे, या गाण्याच्या निमित्ताने गौतमी पाटील आणि भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. या म्युझिक व्हिडिओचे चित्रीकरण कोकणातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. तेथील हिरवागार निसर्ग आणि नयनरम्य समुद्रकिनारे यांमुळे या गाण्याला एक वेगळाच जिवंतपणा आणि आकर्षण लाभले आहे.
या गाण्यात गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांचे एकापेक्षा एक भन्नाट लूक्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. गाण्याच्या काही भागांत गौतमी पाटील लाल रंगाच्या पारंपरिक नऊवारी साडीत अस्सल मराठमोळ्या रूपात दिसत आहे, तर पुढील काही सीन्समध्ये दोघेही काळ्या वेशभूषेत, रेट्रो स्टाईल आणि वेस्टर्न लूकमध्ये थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या या वेगवेगळ्या लूक्ससोबतच दोघांनी केलेल्या उत्स्फूर्त आणि भन्नाट नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर या गाण्याला आणि नव्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला असून दोघांनीही जबरदस्त डान्स केल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
















