कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आता अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची जोड मिळाली आहे. त्यामुळे आता ख-या अर्थाने गोकुळच्या सत्ता संघर्षाला निर्णायक वळण मिळाले आहे. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्यास सुरुवात होणार असून ८ ऑक्टोबरला माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक बिनविरोध होणार का, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, १८ ऑक्टोबरला मतदान आणि दुस-या दिवशी म्हणजे १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
सहकार निवडणूक प्राधिकरण तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून मतदार यादीसंदर्भात जे काही आदेश प्राप्त होतील, त्यानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करत, ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. एकूण २५ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे. प्रत्यक्ष प्रचारालाही आता रंग चढणार असून, दि. १९ ऑक्टोबरला रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणीत ‘गोकुळ’च्या सत्तेचा फैसला होणार आहे. गोकुळच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्याने, जिह्यातील वातावरण तापणार आहे. गोकुळच्या संचालक मंडळातील २५ जागांमध्ये सर्वसाधारण गटाच्या २०, अनुसूचित जाती-जमातीची १, विमुक्त जाती-भटक्या जमातीची १, इतर मागासवर्गाची १ आणि महिलांसाठी राखीव २ जागा आहेत.
निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया १५ ते २२ सप्टेंबर. अर्ज छाननी २३ सप्टेंबर. वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्धी २४ सप्टेंबर. उमेदवारी अर्ज मागे घेणे – २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर. उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध आणि निवडणूक चिन्हांचे वाटप – ९ ऑक्टोबर. मतदान – १८ ऑक्टोबर. मतमोजणी – १९ ऑक्टोबर.
















