परभणी : परभणी- मानवत राष्ट्रीय महामार्ग ६१ वर यशवाडी शिवारात महामंडळाच्या बस आणि दुचाकीचा भीषण झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार, दि.९ मे रोजी दुपारी २.३० ते ३ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खांडवी वाडी (ता. परतूर) येथील अनिल जाधव व आशामती अनिल जाधव हे दोघे पती- पत्नी यशवाडी येथे दर्शनासाठी आले होते. देवाचे दर्शन घेऊन आनंदाने परतत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास एसटी महामंडळाच्या (एमएच १४ एमच १५६१) या क्रमांकाच्या बसने दुचाकी क्रमांक (एमएच २० एफए ७५६८) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी थेट बसच्या पुढच्या चाकाखाली गेली. यामध्ये दुचाकीवरस्वार अनिल जाधव व आशामती अनिल जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बसने दुचाकीला ब-याच अंतरापर्यंत फरफटत नेल्याची माहिती उपस्थितांकडून समजली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

