जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील मठाची ओळख असलेल्या ‘महादेवी उर्फ माधुरी’ हत्तिणीच्या वापसीचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आला आहे. बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या ऑनलाइन सुनावणीत मठात उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला.
नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि ‘वनतारा’ यांच्या प्रतिनिधींनी माधुरीला परत आणण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. सुनावणी पूर्ण झाली असून समितीने निकाल राखून ठेवला आहे. २३ जूनला उच्चस्तरीय समितीचे सदस्य, सेंट्रल झूचे सदस्य, महाराष्ट्र शासन, वनविभागाचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर १७ जुलैला झालेल्या सुनावणीत ५ ऑगस्टपर्यंत नांदणी येथे माधुरी हत्तिणीसाठी केलेल्या सोयीसुविधांची पाहणी करण्याचे आदेश संयुक्त समितीला दिले होते.
त्यानुसार १० ऑगस्टला संयुक्त समितीने नांदणी येथे उभारण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी करून याबाबतचा उच्चस्तरीय समितीकडे अहवाल सादर केला होता. त्यामुळे बुधवारी सायंकाळी ऑनलाइन सुनावणी झाली. यात पेटाने माधुरी हत्तिणीला नांदणी मठात पाठवू नये, अशी मागणी केली. त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील अॅड. मनोज पाटील यांनी नांदणी येथे सध्या उभारण्यात आलेले सुविधा केंद्र हे थोड्या कालावधीसाठी उभारण्यात आलेले आहे. कायमस्वरूपीसाठी नव्याने लवकरच प्रशस्त असे हत्तीसाठी सोयीसुविधा उभारण्यात येणार आहे.
















