मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा ७२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दिल्लीबाहेर गुजरातमधील केवडिया येथे होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २२ सप्टेंबरला हे पुरस्कार प्रदान केले जातील. पहिले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार १९५४ मध्ये दिल्लीतील विज्ञान भवनात झाले होते. तेव्हापासून हा पुरस्कार सोहळा दिल्लीतच आयोजित केला जात होता. यंदाचे पुरस्कार जुलैमध्ये जाहीर झाले होते. मात्र, पुरस्कार प्रदान सोहळा दिल्लीत न होता केवडिया येथे होणार असल्याचे समजते. यावरून आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत टीका केली आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचे, मुंबई शहराचे महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचे जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? स्वत:ला काही निर्माण करता आले नाही की बदल नावे, बदल स्थळे आणि यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असे दिसतेय. बरं कधी ना कधी आता उरलो गुजरात पुरते अशी आपली गत होणार याची खात्रीच वाटत असल्यामुळे किमान तिकडे तरी माहात्म्य निर्माण करून घेऊ हा अट्टाहास सध्या केंद्राचा दिसतोय, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईत का नाही आणले? गुजरातच का?
बरं समजा पुरस्कार सोहळ्याचे स्थळ हलवायचे होते तर ते मुंबईत का नाही आणलं? ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला त्या राज्यात का नाही पुरस्कार वितरण? किंवा देशात सगळ्यात जास्त सिनेमे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे घडवले जातात यापैकी कुठल्या राज्यात हा सोहळा का नाही? दक्षिणेत तर सिनेमांनी तिथल्या राजकारणाला आकार दिला आहे. गुजरातच का? या आधी देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेली राज्य त्यांनी ओढूनताणून मोठी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
















