मुंबई : मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणा-या ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर रेल्वेने त्याची गंभीर दखल घेतली आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांत खाद्यपदार्थ पुरवणा-या कंत्राटदारांसाठीच्या दंडाच्या नियमांत बदल करण्यात आल्याचे पत्र जारी केले आहे.
त्यानुसार दोषी कंत्राटदारांना पाच लाख रुपयांपर्यंत कमाल दंड होणार आहे. आतापर्यंत दंडाची जास्तीत जास्त रक्कम २५ हजार रुपये होती. वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वेने देशभरात ‘वंदे भारत’ गाड्या सुरू केल्या आहेत.
या गाडीसह इतर मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना खानपान सेवा पुरवण्याची जबाबदारी ‘इंडियन केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून सीएसएमटी ते साईनगर शिर्डी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये देण्यात येणा-या जेवणाचा दर्जा चांगला नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती.
एक्स्प्रेसमधील खानपानाच्या डब्यात उंदीर आणि झुरळे फिरत असल्याचे प्रवाशांनी काढलेले अनेक व्हीडीओही व्हायरल झाले होते.