नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांना पत्र लिहून जपानमध्ये १ जानेवारी रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांसोबत आणि जपानसोबत भारत उभा असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान किशिदा यांना पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारत जपानसोबतच्या संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदार म्हणून महत्त्व देतो आणि यावेळी भारत सर्व शक्य मदत देण्यास तयार आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी त्यांच्या जपानी समकक्षांना सांगितले की ते जपानमध्ये झालेल्या भूकंपाबद्दल “अत्यंत दु: खी आणि चिंतित” आहेत आणि भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल “संवेदना” व्यक्त करतात. १ जानेवारी रोजी जपानमध्ये झालेल्या भूकंपाबद्दल जाणून घेऊन मी खूप दुःखी आणि चिंतित झालो आहे. जपानच्या पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मोदी म्हणाले की, मी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबांबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करतो. आम्ही जपान आणि आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत.
जपानच्या उत्तरेकडील द्वीपकल्प नोटो येथे सोमवारी झालेल्या ७.६ तीव्रतेच्या भूकंपात सुमारे ९० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. भूकंप बचाव कार्यात भाग घेणार्या सेल्फ डिफेन्स फोर्सच्या कर्मचार्यांची संख्या दुप्पट करून ४,६०० बचाव कर्मचारी मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत.

