27.5 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeधाराशिवसास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरिय कायाकल्प पुरस्कार

सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरिय कायाकल्प पुरस्कार

लोहारा : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रुग्णालयासाठी प्रतिष्ठेचा असलेला २०२२-२३ चा राज्यस्तरिय कायाकल्प पुरस्कार सास्तूर (ता. लोहारा) येथील स्पर्श ग्रामीण रूग्णालयाला जाहीर झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून व्दितीय क्रमांकाचा हा पुरस्कार आहे. १० लक्ष रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कायाकल्प मूल्यांकन पद्धतीमध्ये अतिशय सूक्ष्मपणे रुग्णालयाचे मूल्यमापन केले जाते. यामध्ये रुग्णालयाची देखभाल व स्वच्छता, जंतुसंसर्ग नियंत्रण, जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट व्यवस्थापन, रुग्णालयाबाहेर जनतेसाठी दिल्या जाणा-या सुविधा, आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण, शस्त्रक्रियागृह, बा रुग्ण व अंतरुग्ण विभागातील सोईसुविधा व पर्यावरण संतुलनासाठी इको फ्रेंडली साधनांचा वापर आदी प्रकाराने रुग्णालयाचे मूल्यमापन केले जाते. चार पातळीवर मूल्यमापन करून सर्वाधिक गुणांकन प्राप्त संस्थेस महाराष्ट्र पातळीवर प्रथम व व्दितीय क्रमांकाचे कायाकल्प पुरस्कार जाहीर केले जातात. सन २०२२-२३ चा १०० पैकी ९९.७१% गुणांकन मिळवत स्पर्श ग्रामीण रुग्णालय राज्यपातळीवर व्दितीय क्रमांकाचे परितोषिक विजेते ठरले आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार दोन वेळेस स्पर्शला प्राप्त झाला आहे., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ईस्माईल मुल्ला व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनाने व उत्कृष्ट नियोजनामुळे तसेच चांगल्या कामाच्या पाठीशी भक्कम साथ, यामुळे धाराशिव जिल्ह्याला हा सन्मान प्राप्त झाला आहे.

रुग्ण विभागात दररोज किमान ३५० च्या वर रुग्णांची तपासणी होते. दरमहा कमीतकमी १०० मोठ्या शस्त्रक्रिया, १५० वर बाळंतपणे, त्यामध्ये अतिजोखामिच्या मातांचे दरमहा ४० ते ५० सिझेरियन शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच अद्यावत नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष उपलब्ध असून या सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत. परिसरातील जवळपास ३८४ गावामधून रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेतात. स्पर्श ग्रामीण रुग्णालयास राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार राज्यात प्रथम क्रमांकाचा ३ वेळा प्राप्त झाला आहे माता बाल संगोपनासाठी शासनातर्फे दिला जाणारा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्काराने चांगली आरोग्यसेवा देण्यास उभारी
गेल्या २५ वर्षापासून स्पर्श ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून प्रतिष्ठेचा कायाकल्प पुरस्कार दुस-यांदा प्राप्त झाला आहे. कर्मचा-यांच्या कामावरील निष्ठेमुळे स्पर्शच्या आरोग्यसेवेच्या पॅटर्नची दखल संपूर्ण राज्याने घेतली आहे. या पुरस्कारामुळे आणखी चांगली आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी वाढली आहे, असे रूग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. रमाकांत जोशी यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR