Homeमहाराष्ट्रकोणत्या योजनेला निधी कमी पडला, भेटला की विचारतो

कोणत्या योजनेला निधी कमी पडला, भेटला की विचारतो

अजित पवार यांचा क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांना टोला

पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला विधानसभेत भरघोस मतदान मिळाले. महायुतीचे सरकार स्थापन होऊन आता सात-आठ महिने होत आहेत, मात्र लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांना निधी कमी पडत असल्याची तक्रार फडणवीसांचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवारांचे शेजारी आमदार दत्तात्रय भरणेंनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमधील एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. यावर अजित पवारांनीही त्यांना कोणत्या योजनेला निधी कमी पडला हे विचारणार असल्याचे म्हटले आहे.

इंदापूर येथे घरकुल धनादेश वितरणाच्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री तथा स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, मी नेहमीच पाठपुरावा करत असतो. मी मुंबईत असू द्या, पुण्यात असू द्या किंवा कुठेही असू द्या, त्यातून माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वाधिक निधी कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करत असतो. आज लाडकी बहीण योजनेमुळे निधी यायला थोडा उशीर होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास उशीर झाला होता. पण आज सर्व हळूहळू गाडी सुरळीत झाली आहे लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला कोट्यवधींचा निधी महिला आणि बाल विकास खात्याला वर्ग करावा लागत आहे.

दत्तात्रय भरणे यांच्याआधी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप केला होता. आमदार संजय गायकवाड यांनी देखील खंत व्यक्त केली होती. आमदार आमशा पाडवी यांनीही आदिवासींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचा आरोप केला होता. आता अजित पवारांच्याच पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्याने योजनांसाठी निधी वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केली आहे.

अजित पवारांचा भरणेंना सवाल
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावर म्हटले की, मी त्याला विचारतो. तो माझा सहकारी आहे. मंत्रिमंडळात आहे. नेमका कुठल्या योजनेला निधी मिळाला नाही, नेमकं कुठल्या अर्थाने ते बोलले हे त्यांना विचारून मी सांगतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR