वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे बेहाल
मुंबई : प्रतिनिधी
कोकण आणि रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पूर्णपणे दाणादाण उडाली आहे. पावसाचा जोर इतका भीषण आहे की, गेल्या ३० तासांहून अधिक काळापासून या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रायगड जिल्ह्याची एकप्रकारे नाकाबंदी झाली.
महामार्गावर अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, डोंगराळ भागातून दरडी कोसळल्याने आणि मोठ्या प्रमाणावर चिखल रस्त्यावर आल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णपणे थांबवली. महामार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रायगडचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पनवेल जवळील पळस्पे फाट्यापासूनच कोकणाकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली. महामार्गावरील वाकण आणि सुकेली खिंड परिसरात डोंगरावरून आलेले पाणी आणि मुसळधार पावसामुळे रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले आहे.
छातीभर पाणी साचल्याने वाहने पुढे जाणे शक्य नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून हा मार्ग प्रशासनाने बंद केला. तसेच रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या कशेडी घाटातील दिवाण खवटी या ठिकाणी सोमवारी एक महाकाय दरड कोसळली. मोठे दगड आणि मातीचा मोठा ढिगारा थेट महामार्गावर आल्याने मुंबईच्या दिशेने येणारी आणि गोव्याच्या दिशेने जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मात्र, दक्षिण रायगडमधील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
८ ठिकाणी दरड कोसळली
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी येथे अख्खा डोंगर कोसळून खाली आला. अभूतपूर्व पावसामुळे या मार्गावर ८ ठिकाणी दरड कोसळली. हा सगळा ढिगारा बाजूला करून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तासन्तास वाहने जागेवर उभी
मुंबई-गोवा महामार्गावर ३० तासांपेक्षा जास्त वेळेपासून वाहने जागेवरच उभी आहेत. त्यामुळे हजारो प्रवासी आणि वाहनचालक महामार्गावर अडकून पडले आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे एसटी बसेस, खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारमधील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. पुढे आणि मागे जायलाही संधी नसल्याने लहान मुलांचे बेहाल झाले आहेत.
















