लातूर : प्रतिनिधी
शहरातील गावभाग परिसरात असलेल्या ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाच्या सांगता दिनी ‘श्री’ च्या नगरप्रदक्षिणेसाठी दिंडी काढण्यात येते. याही वर्षी काढण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वरच्या दिंडीने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीत पारंपारिक वेशभूषेतील महिलांसह वारकरी, तरुण, तरुणी व भाविकांचा उत्स्फुर्त सहभाग होता. पारंपारिक वेशभूषेतील अश्वांवर रुढ झालेल्या तरुणी व बाल वारक-यांनी आपल्या सहभागाने या दिंडीची शोभा वाढवली होती.
शहरात गावभाग परिसरात असलेल्या श्री रामलिंगेश्वर देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहासाठी शहरासह परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याही वर्षी या सप्ताहाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सप्ताहाच्या सांगता दिनी ‘श्री’ ची पालखीची नगरप्रदक्षणा काढण्यात येते. यानिमित्ताने श्री रामलिंगेश्वर मंदिरापासून दि. ३१ जुलै रोजी सकाळी या दिंडीचा शुभारंभ झाला. खडक हनुमान, सुभाष चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक, औसा हनुमानमार्गे या दिंडीचा समारोप श्री रामलिंगेश्वर मंदिराजवळ करण्यात आला. या दिंडीत भाविकांनी मोठ्या उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे पारंपारिक वेशभूषेत महिलांनी डोक्यावर कळस घेवून भक्तीभावाने दिंडीत सहभाग घेतला होता. तसेच हरिरामाचा गजर करणा-या वारक-यांसह बाल वारकरी व अश्वावर रुढ झालेल्या तरुणी या दिंडीचे प्रमुख आकर्षण होते. ढोल, बँडपथक तसेच लातूर शहर परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
नगर प्रदक्षिणा मार्गावर व्यापा-यांसह नागरिकांनी दिंडीचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढून दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. गंजगोलाई परिसरातील व्यापा-यांनी दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. दिंडीदरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
















