बंगळुरू : आयपीएल २०२६ च्या ११ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सचा ४३ धावांनी धुव्वा उडवला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. टीम डेव्हिडच्या फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित २० षटकांत २५० धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे यांसारखे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. ज्यामुळे संघाला सलग तिस-या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, आजच्या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत मोठी झेप घेतली. दोन सामन्यांत दोन विजय आणि ४ गुणांसह उत्कृष्ट नेट रनरेटमुळे बंगळुरू संघ अव्वल स्थानावर पोहोचला. दुसरीकडे एमएस धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची अवस्था खराब झाली असून, त्यांना स्पर्धेत सलग तिस-या पराभवाचा धक्का बसला. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तळाशी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई करत २५० धावांचा डोंगर उभा केला. आरसीबीच्या फलंदाजांनी गिअर बदलत चेन्नईच्या गोलंदाजी धुलाई केली. मोठ्या धावांचा पाठलाग करताना चेन्नईची टीम १९.४ षटकांत २०७ धावांवर सर्वबाद झाली. त्यामुळे बंगळुरूचा ४३ धावांनी विजय झाला.

