नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील फूलबाजारात लगबग वाढली असून, पूजेसह घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या सजावटीसाठी फुलांना मोठी मागणी आहे. मागणी वाढल्यामुळे फुलांच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या २०० ते २५० रुपये जाळी असलेला झेंडू पुढील १० दिवसांत ५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवात शहरातील फूलबाजारात मोठी मागणी वाढल्यामुळे बाजार फुलला आहे. लाडक्या बाप्पाच्या जय्यत आगमनासाठी व पूजेसाठी घर, मंडप आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत फुलांच्या दरात वाढ झाली असून, आगामी सणासुदीच्या दिवसात फुलांचे दर आणखी वाढणार आहेत.
झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा, गुलछडी यांच्यासह विविध फुलांची आवक बाजारात झाली असली, तरी विशेषत: झेंडूच्या फुलांना गणेशोत्सवात मोठी मागणी असते. हार, तोरण तसेच सजावटीसाठी वापरल्या जाणा-या झेंडूच्या दरात वाढ झाली आहे. मोगरा आणि गुलाबाला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
गणेशोत्सव काळात फुलांची मागणी वाढण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे. सणाच्या दिवसांत मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने ग्रामीण भागातून फुलांची आवक वाढविण्यासाठी व्यापा-यांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर फुलांची आगाऊ मागणी नोंदविली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे किरकोळ ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसत आहे. मात्र, गणेशोत्सवाचा उत्साह कायम असल्याने ग्राहकांकडून वाढीव दरातही फुलांची खरेदी केली जात आहे.
















