मुंबई : राज्यातील पोलिस कर्मचा-यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलिसांना घरांच्या सुविधेसाठी राज्य सरकारने १७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, या निर्णयाचा लाभ ५४५९ पोलिस कर्मचा-यांना मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत पोलिसांच्या घरांच्या प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणा-या पोलिसांना स्वत:चे घर मिळाले पाहिजे, यासाठी आपण सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचे त्यांनी म्हटले. २०१४ ते २०१९ या काळात मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही योजना बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना नव्याने सुरू करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पोलिस कर्मचा-यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. वाढत्या घरांच्या किमती आणि आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर घरबांधणीसाठी मिळणारे अग्रीम अनुदान पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश या निर्णयातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी काळात पोलिसांच्या निवासाच्या प्रश्नांवर आणखी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे संकेतही या घोषणेतून मिळत आहेत.

