राज्यावर सध्या सूर्याचा प्रकोप झालेला दिसतो. संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार विदर्भासह राज्याच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये उकाडा अस झाला आहे. ही परिस्थिती पाहून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विदर्भात उन्हाचा चटका सर्वाधिक जाणवत असून अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४३.१अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे सोमवारी नोंदवण्यात आलेले देशातील सर्वाधिक तापमान ठरले. अकोला पाठोपाठ विदर्भातील इतर शहरांमध्येही पारा चढलेलाच आहे. अमरावती आणि वर्धामध्ये ४२ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि गडचिरोलीमध्ये ४१ अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, जळगाव, धुळे, सोलापूर, परभणी येथेही तापमान ४१ अंशाच्या पुढे गेले आहे. ठाणे आणि राजगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
१५ एप्रिलपासून विदर्भासह राज्याच्या इतर भागात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. बिहारपासून तामिळनाडूपर्यंत विस्तारलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात हे बदल होत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे होणारे आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारने तीन व्यापक मानक कार्यपद्धती लागू केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, विशेषत: उघड्यावर काम करणारे मजूर आणि खाण कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या जिल्ह्यांमध्ये लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड यांचा समावेश आहे. चंद्रपूरमधील कोळसा खाण कामगारांसाठी आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माण व्यवस्था करण्यावर सरकार भर देत आहे. दुपारच्या वेळी तापमान ४० अंशाच्या पार जात असल्याने शक्यतो घराबाहेर पडणे टाळणे, सतत पाणी पिणे आणि कडक उन्हापासून स्वत:चा बचाव करणे आवश्यक आहे. विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार जगातील १० सर्वांत उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश आहे. यात अकोला हे जगातील दुसरे सर्वांत उष्ण शहर ठरले आहे.
अकोल्यात तापमानाचा पारा ४३ अंशाच्या पुढे गेला आहे. टॉप १० मध्ये चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि वर्धा या शहरांचाही समावेश आहे. या शहरांमधील तापमान सातत्याने ४२ ते ४५ अंशादरम्यान राहत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते जर उष्णतेची हीच लाट कायम राहिली तर मे महिन्यात पारा ५० अंश सेल्सिअस ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात बहुतांश ठिकाणी अंगाची लाही-लाही होत असून उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. कमाल तापमान चाळीशी पार गेले आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा धोका असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह राज्यातील ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान कोरडे, उष्ण आणि काही भागात दमट राहण्याचा अंदाज आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघात होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. उष्माघाताच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आले आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात उष्णतेची तीव्रता सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक शहरांमध्ये सिमेंटच्या जंगलामुळे ‘अर्बन हीट आयलंड’ प्रभाव जाणवत असून तापमान अधिकच वाढत आहे. शेतक-यांसाठी चिंतेची बाब म्हणजे, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कडक उन्हामुळे पाणीसाठ्यातही झपाट्याने घट होत असून पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या पहिल्या १५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाच तर देशातील एकूण १० शहरांचा समावेश होता. अकोला शहर जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले. तेथे ४४ अंश तापमानाची नोंद झाली. कर्नाटकातील कलबुर्गी येथेही ४४ अंश तापमानाची नोंद झाली. तापमानवाढीची नेमकी कारणे म्हणजे जागतिक तापमान वाढीचा परिणाम स्थानिक हवामानावर होत आहे. उत्तर-पश्चिम भारताकडून येणा-या उष्ण आणि कोरड्या वा-यांमुळे विदर्भातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे. कमी झालेली वनसंपदा हेही एक कारण आहे. शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे जमिनीची उष्णता शोषून घेण्याची क्षमता वाढली आहे. भौगोलिक स्थिती हेही तापमानवाढीचे एक कारण आहे. विदर्भाची पठारी भौगोलिक रचना सूर्याच्या किरणांना थेट आणि तीव्र बनवते. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार आगामी ५ ते ७ दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे. मान्सूनचे आगमन होईपर्यंत तापमानात मोठे चढ-उतार पहायला मिळतील. वाढत्या उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी लागेल. चक्कर येणे, मळमळणे, तीव्र डोकेदुखी, जास्त ताप जाणवत असेल तर तो उष्माघात असू शकतो.
अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. स्वत:ची काळजी घेणे हाच सध्या उष्णतेपासून वाचण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १६ व १७ एप्रिल रोजी तापमानात लक्षणीय वाढ होऊन ते ४२ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून उष्माघाताचा धोका वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते सायंकाळी ४ दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे, डोके झाकण्यासाठी टोपी किंवा रुमाल वापरणे तसेच थेट सूर्यप्रकाशापासून दूर राहणे आवश्यक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. शेतकरी, मजूर आणि बाहेरील काम करणा-या व्यक्तींनी कामाचे वेळापत्रक सकाळी किंवा सायंकाळी ठेवावे असे प्रशासनाने सुचविले आहे.
