Homeसंपादकीयमखमली सूर हरपले...!

मखमली सूर हरपले…!

‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’, ‘ऋतू हिरवा, शूरा मी वंदिले’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘माँग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फें तेरी’, ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘दिल चीज क्या है’, ‘इन आँखो की मस्ती के’,‘तन्हा तन्हा’, ‘याई रे’, ‘राधा कैसे न जले’ अशा एकाहून एक अमीट सूरांची बरसात करणारा आशा भोसलेंचा मलमली आवाज रविवारी निमाला. भारतीय संगीत क्षेत्राचा मानबिंदू आणि कोट्यवधी संगीत रसिकांच्या आशाताई अर्थात सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अन्त झाला. शनिवारी संध्याकाळी आशाताईंना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु दुर्दैवाने त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

आशा भोसले यांनी सात दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवली. केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे तर विविध २० भाषांतून त्यांनी तब्बल १२ हजारहून अधिक गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीत, सुगमसंगीत, लावणीपासून ते पॉप म्युझिकपर्यंत सर्वच प्रकारांत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. आशाताईंच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड आणि जागतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. एका महान गायिकेच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विविध प्रकारची गाणी गाऊन त्यांनी आपले वेगळेपण वेळोवेळी सिद्ध केले होते. जुन्या काळातील अभिनेत्रींबरोबरच माधुरी, काजोलपर्यंत अनेक अभिनेत्रींसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. पडद्यावरील कलाकाराला आपला आवाज सूट झाला पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून त्या पार्श्वगायन करायच्या, ही त्यांच्या पार्श्वगायनाची खासियत त्यांच्या लोकप्रियतेचे गमक होते. ‘पिया तू अब तो आजा’, ‘ये मेरा दिल यार का दीवाना’, ‘इन आँखो की मस्ती के’, ‘याई रे याई रे जोर लगा के नाचो रे’, ‘ले गई ले गई’, ‘सांज ये गोकुळी’ अशी कितीतरी गाणी त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केली. आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत झाला.

वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना गाण्याचा वारसा मिळाला. अवघ्या नवव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आणि लता दीदींवर आली. १९४३ मध्ये ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटातील ‘चला चला नव बाळा’ हे त्यांचे पहिले गाणे. १९४८ मध्ये ‘चुनरिया’ चित्रपटातील ‘सावन आया’ या गाण्याने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सुुरुवातीच्या काळात लता मंगेशकर, गीता दत्त, सुरैय्या यांनाच अधिकाधिक गाणी मिळायची. आशाताईंच्या वाट्याला ‘बी’ गे्रड चित्रपटातील गाणी यायची. संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी आशाताईंच्या आवाजातील वेगळेपण ओळखले. ‘नया दौर’मधील ‘माँग के साथ तुम्हारा’ आणि ‘उडे जब जब जुल्फें तेरी’ या गाण्यांनी त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. त्या काळात त्यांनी शास्त्रीय संगीत, कव्वाली आणि रोमँटिक गाण्यांमध्ये आपला ठसा उमटवला. ७०च्या दशकात आर. डी. बर्मन आणि आशा भोसले यांनी भारतीय संगीतात क्रांती घडवली. ‘दम मारो दम’(हरे रामा हरे कृष्णा), ‘पिया तू अब तो आजा’(कारवाँ) यासारख्या गाण्यांमुळे त्यांना ‘पॉप क्वीन’ ही नवी ओळख मिळाली. वयाच्या साठीनंतरही त्यांचा आवाज चिरतरुण राहिला. बाल वयापासून गायनाला सुरुवात करणा-या आशाताईंची सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी गिनीज बुकमध्ये नोंद आहे.

त्यांच्या वेगळ्या आवाजाची भुरळ सा-या जगाला पडली होती. आशाताईंचं आयुष्य हे संघर्षमय आणि वादळी राहिलं. पण नावाप्रमाणेच त्यांनी कुठल्याही प्रसंगात आशा सोडली नाही. आशाताईंना एकूण नऊ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. २००१ मध्ये जीवन गौरव, भारताचा सर्वोच्च कला सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार, देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने त्यांना नावाजले गेले. आशाताईंची खासियत म्हणजे ज्या ठसक्यात त्या लावणी गायच्या, त्याचप्रमाणे त्या जीव ओतून भावगीत देखील गायच्या. सुमारे ८०० चित्रपटांना आवाज देणा-या आशाताई दरवर्षी १५० ते १७० गाणी रेकॉर्ड करत. हीच त्यांची सातत्याची खरी ओळख होती. त्यांच्या हजारो गाण्यांनी केवळ संगीत नव्हे, तर भावनांचा इतिहास लिहिला. एकाच आवाजात प्रेम, वेदना आणि उत्साह व्यक्त होत असे. आजही आशाताईंचे गिनीज रेकॉर्ड अबाधित आहे, तो त्यांच्या अथक परिश्रमाचा जिवंत पुरावा आहे. त्यांचा आवाज आज थांबला असला तरी, आशा भोसले यांची गाणी आणि त्यांची परंपरा कायमच जिवंत राहील यात शंका नाही. आशा भोसले यांची मराठी चित्रपटांतील गाणी अत्यंत लोकप्रिय आहेत.

‘गोमू संगतीनं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘रूपेरी वाळूत’, ‘या रावजी बसा भाऊजी’, ‘मनमोहना तू राजा स्वप्नातला’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘दिस जातील दिस येतील’ यासारख्या सदाबहार गाण्यांचा समावेश आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. आशाताईंच्या निधनाने भारतीय संगीत विश्वातील एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानातील रसिकांनीही आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. लता दीदी आणि आशाताईंनी निर्माण केलेला भारतीय संगीत विश्वाचा सुवर्ण अध्याय समाप्त झाला. पिढ्यान्पिढ्या मनात घर करणारा आवाज यापुढे ऐकू येणार नसला तरी त्यांची अजरामर गाणी जिवंत राहतील. त्यांची स्मृती जिवंत राहील. त्यांचे मंत्रमुग्ध स्वर अमर राहतील. सूरसम्राज्ञी आशाताईंना ‘एकमत’ची भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR