परभणी : मानवत तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवार, दि.१६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड करून लुटण्यात आल्याची घटना घडली. चोरट्यांनी रेल्वे थांबताच जनरल डब्यासह आरक्षित डब्यातील दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समजते. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मानवतरोड रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबल्यानंतर चोरट्यांनी जनरल डब्यातील एका महिलेच्या गळ्यातील २ ग्रॅमचे मंगळसूत्र ओढले. त्यानंतर एस-४ क्रमांकाच्या डब्यातील उषा (रा.आंध्र प्रदेश) या महिलेच्या गळ्यातील ८ ग्रॅमचे लॉकेट आणि ८ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. रात्रीची वेळ असल्याने बहुतांश डब्यांचे दरवाजे आतून बंद होते. ज्यामुळे चोरट्यांना सर्व डब्यांत शिरता न आल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे मानवतरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी रेल्वे पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने अनेकदा केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान साईनगर शिर्डी एक्सप्रेसला मानवतरोड येथे थांबा नाही. ही गाडी पहाटे २.५५च्या सुमारास स्थानकात येण्यापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी केबल कापून सिग्नल यंत्रणा निकामी केली. चालकाला होम सिग्नल डेंजर दिसल्याने त्याने खबरदारी म्हणून गाडी प्लॅटफॉर्मच्या काही अंतरावरच थांबवली. गाडी थांबताच चोरट्यांनी डब्यात शिरून महिला प्रवाशांना लुटण्याचा प्रकार घडला.
या घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. आरपीएफ क्राईम ब्रँचचे उपनिरीक्षक दिलीप कांबळे, जीआरपीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश जोगदंड व पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक खोळंबली होती. सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाल्यानंतर रेल्वेला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. पीडित महिला प्रवासी जे. उषा यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवल्याची माहिती समजते.

