हैदराबाद : वृत्तसंस्था
भारताला ६-जी टेक्नॉलॉजीच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. ‘आयआयटी’ हैदराबादने ७ गिगाहर्टझ् बँडमध्ये ६-जी प्रोटोटाइपचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे तंत्रज्ञान २०३० पर्यंत रोल आउट होण्याची अपेक्षा आहे. विद्यमान ५-जी च्या तुलनेत हे अधिक वेगवान असेल आणि गाव-शहर, आकाश, जमीन आणि समुद्र अशा सर्व ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोहोचवली जाईल.
‘आयआयटी’ हैदराबादचे प्रा. किरण कुची यांच्या मते, दर दहा वर्षांनी मोबाईल टेक्नॉलॉजीची नवी जनरेशन विकसित केली जाते. ५-जी तंत्रज्ञान २०१०-२०२० दरम्यान विकसित झाले, तर २०२२ पासून याचा देशात विस्तार सुरू झाला. ६-जी प्रोटोटाइप तयार करण्याची सुरुवात २०२१ मध्ये झाली असून, २०३० पर्यंत ते सुरू होण्याची शक्यता आहे.
लो-पॉवर चिप डिझाईन : ६-जी तंत्रज्ञानासाठी आयआयटी हैदराबादने एक लो-पॉवर सिस्टीम चिप डिझाईन केली आहे, जे नागरिक व संरक्षण क्षेत्रात टेरेस्ट्रियल आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी पुरवेल. सध्या आयआयटी हैदराबाद हे तंत्रज्ञान हाय-परफॉर्मन्स ६जी-‘एआय’ चिपसेट्स मध्ये विकसित करण्याचे काम करत आहे.
६-जी आल्यानंतर एआर/व्हीआर, ‘एआय’युक्त डिव्हाइसेस आणि ऑटोनॉमस मोबिलिटीचा अनुभव अधिक चांगला होईल. फॅक्टरी, शाळा, रुग्णालय, संरक्षण क्षेत्र व आपत्ती व्यवस्थापनात ६-जी डिव्हाइसेस महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळे देशाची उत्पादकता व सुरक्षा क्षमता वाढेल.
टेक्नॉलॉजीत भारत ट्रेंडसेटर
भारताने अलीकडे नेटवर्क्स, डिव्हाइसेस, एआय अॅप्लिकेशन्स आणि फॅबलेस चिप डिझाईनमध्ये स्वदेशी इनोव्हेशनला मोठे प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे भारत आता ग्लोबल सप्लायर आणि स्टँडर्ड सेटर म्हणून उदयास येत आहे. २०३० मध्ये जेव्हा जगभरात ६-जीचा प्रसार होईल, तेव्हा भारत स्वत:च्या टेक्नॉलॉजी, प्रॉडक्ट्स, कंपन्या आणि इकोसिस्टीमच्या मदतीने २०४७ च्या विकसित भारताच्या व्हिजनकडे वाटचाल करेल.
















