Homeअंतरराष्ट्रीयइराणचे सर्वोच्च नेते खामेनी ठार

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी ठार

इराणला मोठा धक्का, क्षेपणास्त्रांचा मारा, ४० कमांडरही मृत्युमुखी
तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. शनिवारी इस्रायलने खामेनी यांच्या कार्यालयावर सुमारे ३० क्षेपणास्त्रे डागली, ज्यामध्ये खामेनी आणि ४० कमांडर ठार झाले. या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झाला. इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह १० प्रमुख शहरांना लक्ष्य केले. या हल्ल्यांत २०० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले तर ८०० हून अधिक नागरिक जखमी झाले. एका शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १४८ विद्यार्थिनी मृत्युमुखी पडल्या आणि ४५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, इराणनेही प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले असून, अमेरिका, इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे.

इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्लाह अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच इराणचे इस्लामिक कन्सल्टेटिव्ह असेंब्लीचे अध्यक्ष कालिबाफ यांनी मोठा दावा केला. त्यांनी आम्ही खामेनींच्या मृत्यूसह चार शक्यता गृहित धरल्या होत्या, असे म्हटले. त्यामुळे इराण इतक्यात माघार घेणार नसल्याचे संकेत आहेत. इराणने अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेशी संबंधित २७ ठिकाणांवर हल्ला चढवला. इराणने यावेळी प्रथमच इस्त्रायलकडे ड्रोन, बॅलेस्टिक मिसाईल डागल्या नाहीत. उलट अमेरिकेला आणि इस्त्रायलला मदत करू शकतील, अशा सर्व ठिकाणांना पहिल्यांदा टार्गेट केले. त्यामुळे इस्त्रायलवर एक हाती हल्ला करताना अडचण येऊ नये, अशी इराणची योजना आहे. यासोबतच इराणने अमेरिकेची पाच एअरबेस टार्गेट केली आहेत.

कालिबाफ म्हणाले की, आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह सर्व परिस्थितींसाठी आम्ही नियोजन केले होते. आम्ही महान इमाम आणि आमच्या शहीद इमामचा मार्ग प्रामाणिकपणे चालू ठेवू. दरम्यान, खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड होऊ शकते. मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेते म्हणून नियुक्तीची तयारी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

इराणमध्ये राजकीय
अस्थिरतेची स्थिती
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याने इराणमध्ये राजकीय अनिश्चिततेची स्थिती निर्माण झाली आहे. गेली चार दशके इराणवर राज्य करणा-या अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर आता त्यांचा वारसदार कोण असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सत्तेचे हस्तांतरण शांततेत होणार की संघर्षात, हा आता इराणसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.

धर्मगुरूंची सभा
ठरवते सर्वोच्च नेता
इराण आणि व्हॅटिकन सिटी हे जगातील एकमेव असे दोन देश आहेत, जिथे धार्मिक नेते सर्वात शक्तिशाली आहेत. जसे व्हॅटिकनमध्ये पोप सर्वोच्च नेते आहेत, तसेच इराणमध्ये खामेनी सर्वोच्च नेते आहेत. रहबर म्हणजे मार्गदर्शक किंवा मार्ग दाखवणारा. इराणमध्ये ८८ धर्मगुरूंची सभा सर्वोच्च नेत्याची निवड करते.

धर्मगुरूंना एकत्र येणे कठीण
सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले सुरूच ठेवण्याचा इशारा दिल्याने ८८ धर्मगुरुंना एका ठिकाणी जमून चर्चा करणेही धोक्याचे ठरू शकते. तरीही सत्ता स्थिर असल्याचे दाखवण्यासाठी तज्ज्ञ समिती लवकरच आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

इराणचे नागरिक रस्त्यावर
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणच्या रस्त्यांवर लोक शोक करताना दिसले. लोकांनी ‘डेथ टू अमेरिका’ आणि डेथ टू इस्रायलच्या घोषणा दिल्या आणि प्रत्युत्तरादाखल कारवाईची मागणी केली. भारतातही शिया समुदायाचे लोक खामेनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. श्रीनगर, लेह, लखनौ येथून निदर्शनांची छायाचित्रे समोर आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR