लातूर : प्रतिनिधी
२०२६-२७ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशाची सोडत (लॉटरी) सोमवार दि. ६ एप्रिल रोजी निघाली होती. त्यानुसार आरटीई २५ टक्के प्रवेश शाळा निहाय विद्यार्थी निवड यादी जाहीर झाली आसून लातूर जिल्हयातील २ हजार २६९ मोफत प्रवेशापैकी गेल्या सात दिवसात केवळ सातच प्रवेश झाले आहेत. पालकांच्या पाल्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी आवघे चार दिवस उरले आहेत. सोमवार दि. २० एप्रिल ही प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उर्वरीत प्रवेश वेळेत होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे. आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील स्वंय अर्थसहित, विना अनुदानीत २०७ शाळांची नोंदणी केली आहे. या शाळेतील २ हजार ३४३ मोफत प्रवेशाच्या जागेसाठी पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश मिळावा म्हणून ६ हजार ६९९ पालकांनी ऑनलाईन अर्ज नोंदवले होते. त्या संदर्भाने मोफत प्रवेशाची सोडत (लॉटरी) दि. ६ एप्रिल रोजी निघाली. लातूर जिल्हयातील २ हजार २६९ पालकांच्या पाल्यांची पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेशासाठी निवड झाल्याची लॉटरी लागली. त्यानुसार १० एप्रिल पासून पालकांना प्रवेशाचे एसएमएस पाठवण्यात आले.
लातूर जिल्हयातील जळकोट तालुक्यात केवळ ७ प्रवेश झाले आहेत. इतर नऊ तालुक्यात आरटीईचा एकही प्रवेश झाला नाही. सात दिवसात सात प्रवेश झाल्याने उरलेल्या चार दिवसात उर्वरीत प्रवेश प्रक्रीया पार पाडणे कठीण होणार आहे.

