23.8 C
Latur
Wednesday, March 11, 2026
Homeपरभणीपरभणीत मतदारांनी नाकारली घराणेशाही

परभणीत मतदारांनी नाकारली घराणेशाही

माजी मंत्री सुरेश वरपूडकरांना धक्का

परभणी : प्रतिनिधी
काही काळापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा दारुण पराभव करत मतदारांनी घराणेशाहीला फुल्ली मारली होती.

आता परभणी जिल्हा परिषदेमध्येही भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपल्याच घरातील पाच जणांना वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी दिली होती, पण तरीही मतदारांनी घराणेशाहीला सपशेल नाकारले आहे. एकाच कुटुंबातील पाच उमेदवारांपैकी चार जणांचा दारुण पराभव करत मतदारांनी माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांना चांगला धक्का दिला आहे. परभणी तालुक्यातील लोहगाव सर्कलमधून पुतण्या अजित वरपूडकर याने मात्र कुटुंबाची लाज राखली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या अजित वरपूडकर या कुटुंबातील एकमेव सदस्याचा विजय झाला आहे.

भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याच घरातील तब्बल पाच जणांना वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी दिली होती. मुलगा समशेर वरपूडकर याला शिंगणापूर गटातून, पुतणे ऐश्वर्य हे जांब गटातून, तर सून प्रेरणा या दैठणा गटातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. याशिवाय मुलगी सोनल देशमुख ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून झरी गटातून उभ्या होत्या. तर पुतण्या अजित वरपूडकर देखील काँग्रेसकडून लोहगाव गटातून उभे राहिले. पाच उमेदवार दिल्यामुळे वरपूडकर यांच्या घरातील सदस्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.

सुरेश वरपूडकर यांचा मुलगा समशेर वरपूडकर, सून प्रेरणा वरपूडकर, पुतण्या ऐश्वर्य वरपूडकर तर मुलगी सोनल देशमुख या चौघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे केवळ लोहगाव गटातून काँग्रेस पक्षाकडून उभे असलेला पुतण्या अजित वरपूडकर मात्र विजय झाला आहे. माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपला घरगुती पॅटर्न राबवल्यानंतर मात्र मतदारांनी त्याला सपशेल नकार दिला आहे.

घरातील चारही उमेदवाराचा पराभव झाल्याने माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांना चांगलाच धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची पत्नी विजयी झाली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही सुरेश वरपूडकर यांनी आपल्या घरातील जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या या प्रयत्नाला आता अपयश आले आहे.

नगरपालिका निवडणुकीत लोहगाव नगरपालिकेत एकाच घरातील पाच जणांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या पाचही जणांचा पराभव झाला होता ही बातमी राज्यभर चर्चिली गेली होती. त्यानंतर परभणी मध्ये देखील असाच प्रकार माजी मंर्त्याने केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे यामुळे मतदार राजा हा घराणेशाहीला नाकारत असल्याचे देखील समोर आले आहे त्याचबरोबर धनशक्तीला देखील या मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR