Homeमहाराष्ट्रमुंबई महापालिकेत पहिल्याच दिवशी भाजप-ठाकरे सेना आमने-सामने

मुंबई महापालिकेत पहिल्याच दिवशी भाजप-ठाकरे सेना आमने-सामने

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिकेत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना युतीने महापौर-उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी भाजप-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक आमने-सामने आल्याने गोंधळ उडाला.
भाजप नगरसेवकांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देताच, ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी ‘चोर है चोर है’च्या घोषणा दिल्या. पुढे ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ नावाच्या घोषणा सुरू होताच, ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी ‘ठाकरे-ठाकरे’, अशी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने मुंबई महापालिकेच्या सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.

मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सत्ता भाजपने हस्तगत केली. भाजपचा महापौर आज विराजमान झाला. रितू तावडे यांनी पदभार स्वीकारला. मुंबई महापालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात आली. मात्र, सत्तारोहणाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरे सेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

मुंबई पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. भाजपच्या महापौरांच्या सत्तारोहणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या अंगात प्रचंड उत्साह होता. यातून भाजपच्या नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

भाजपच्या नगरसेवकांकडून मोदी-मोदीचा जयघोष थांबतच नव्हता. तेव्हा समोर उभ्या असलेल्या ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या ‘मोदी-मोदी’ पाठोपाठ अचानक ‘चोर है, चोर है’, अशा घोषणा सुरू केल्या. ठाकरेसेनेच्या या नगरसेवकांच्या आक्रमकतेपुढे भाजप नगरसेवकांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा थांबवल्या.

‘मोदी-मोदी’च्या घोषणा थांबवल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ नावाने घोषणा सुरू केल्या. ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी ‘चोर है, चोर है’ घोषणा लगेच थांबवून, ‘ठाकरे-ठाकरे’ नावाचा जयघोष सुरू केला. दोन्ही बाजूंच्या घोषणांमुळे पालिकेचे सभागृह दणाणून गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम महापालिकेतील सभागृहाच्या गॅलरीत बसून हा सर्व प्रकार शांतपणे पाहत होते. पहिल्याच दिवशी ठाकरे सेना आणि भाजप नगरसेवक आमने-सामने आल्याने, खडाजंगी झाल्याने, आगामी काळातही मुंबईतील राजकारण, महापालिकेभोवती फिरत राहणार अशी चिन्हं आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR