लातूर : प्रतिनिधी
शहरामध्ये रविवार दि. २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी ५ वर्षाच्या आतील ४२,८२३ बालकांना पोलिओची लस पाजण्यात येणार आहेत. यासाठी शहरामध्ये एकूण २४० पोलिओ लसीकरण केंदाच्या ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी लातूर महानगरपालिका कार्यालय, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय येथील अंगणवाडी कर्मर्चायांची, तसेच विवीध खाजगी शाळांच्या शिक्षकांची बुथप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील त्याचप्रमाणे नर्सिंग स्कूल मधील जी. एन. एम. स्टूडंटचा सहभाग घेण्यात येत आहे. तसेच शहराच्या विविध ठिकाणी, शहराच्या बाहेरील भागातील तुरळक वसाहत, बसस्थानक, बसचे थांबे इत्यादी ठिकाणी बुथची व मोबाईल टिमची सोय करण्यात आली आहे.
सर्व पालकांनी आपल्या कुटूंबातील ५ वर्षाच्या आतील बालकास यापुर्वी किती ही वेळेस पोलिओचा डोस पाजलेला असला तरी, बाळ आजारी असले तरीही (वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्याने) व नुकतेच जन्मलेले बाळ असले तरीही पोलिओचे २ थेंब नजीकच्या पोलीओ लसीकरण केंदावरती जाऊन पाजवून घ्यावे व सहकार्य करावे. पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन महानगरपालिका, लातूरच्या वतीने करण्यात येत आहे.
















