परभणी : गेल्या २ दिवसांपासून शहरासह परिसरात पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांमध्ये पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतीसाठी लागणा-या शेत साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
परभणी शहरातील नवा मोंढा बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पेरणीसाठी लागणारे साहित्य दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेले पासे, कुराड, खुरपे, वीळा, पावडे, जोडमोगा, सिंगर मोगा, डबल वाटी, बैलाचा कासरा, ताडपत्री, लाकडी पन्ना कास, औत कासरा, औत चाबूक, जोते घागरमाळ पोगर आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा भागात शेतक-यांची गर्दी पहायला मिळत आहे. सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. येत्या काळात चांगला पाऊस होईल यादृष्टीने शेती कामांसाठीच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
















