लातूर : प्रतिनिधी
जे तलाठी सज्जात राहत नाहीत, सज्जात जात नाहीत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. ज्यांची तलाठी कार्यालये बेकायदेशीररित्या शहरात आहेत, ते बंद करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
लातूर तालुक्यातील कासारखेडाचे मंडळ अधिकारी महेश हिप्परगे यांच्याबाबत लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिलेल्या अहवालावरून जिल्हाधिका-यांनी हिप्परगे यांच्यावर केलेली निलंबनाच्या कार्यवाहीचेही खंडापूरकर यांनी या निवेदनात समर्थन केले आहे. मुळातच जे तलाठी सज्जात राहत नाहीत. त्या सर्वांची तलाठी कार्यालये बेकायदेशीररित्या शहरामध्ये असल्याने शेतक-यांना तलाठ्यांकडे जाण्यासाठी नाहक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे जे तलाठी सज्जात राहत नाहीत, सज्जात जात नाहीत, ज्यांची कार्यालये शहरामध्ये आहेत सर्वप्रथम त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रति निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार लातूर यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदन देताना प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्यासमवेत समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा राणीताई स्वामी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराजसिंह पाटील खंडापूरकर, वैभव घोबाळे, शिवा काळे पाटील, सुरेखा गाडेकर,काशीबाई हांडे, अज्ञानताई माने, महेश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
















