परभणी : जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित झालेल्या पात्र शेतक-यांना तातडीने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सोडण्यात आलेल्या प्रत्येकी १२ फूट जागेचे खडीकरण करून सर्व्हीस रोडचे बांधकाम महामार्गाच्या मुख्य कामासोबतच पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रवक्ते जलील पटेल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जालना-नांदेड समृद्धी महामार्गामुळे सध्या
वापरात असलेले कच्चे व स्थानिक शेतरस्ते बंद होत असल्याने भविष्यात संबंधित शेतक-यांसमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. महामागार्साठी दोन्ही बाजूंना सर्व्हिस रस्त्यासाठी सोडण्यात आलेल्या जागांचे खडीकरण व सर्व्हिस रोडचे बांधकाम न झाल्यास शेतकरी ती जागा आपल्या वहिवाटीत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात वहिवाटीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामार्गाच्या मुख्य कामासोबतच सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना द्यावेत, अशी मागणी पटेल यांनी केली आहे.
भूसंपादनामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले असून काही कुटुंबे भूमिहीन झाली आहेत. बाधित पात्र शेतक-यांना तातडीने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी पटेल यांनी मुंबई भेटीदरम्यान केली आहे. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून संबंधित कुटुंबांच्या भावी पिढ्यांना रोजगाराच्या संधी, शिक्षण तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. बाधिल शेतक-यांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्यासोबतच त्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
















