मॉस्को : वृत्तसंस्था
रशियाने आपल्या अधिका-यांना १ सप्टेंबरपर्यंत स्वदेशी मेसेजिंग ऍप ‘मॅक्स’वर स्विच करण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडच्या काळात मॉस्को टेलिग्राम, व्हॉट्सऍप आणि यूट्यूब सारख्या परदेशी ऍप्सचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाने फेसबुक आणि व्हॉट्सऍपची मालकी असलेल्या मेटाला ‘अतिरेकी संघटना’ म्हणून घोषित केले होते.
रशियात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. आता ऑगस्टच्या सुरुवातीला रशियातूनही व्हॉट्सऍपवर बंदी घातली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर रशियन नागरिकांनाही त्यांच्या देशाच्या मेसेंजर ऍपवर स्विच करणे भाग पडणार आहे.
रशियन सरकार परदेशी मेसेंजर ऍप्सला असुरक्षित मानत असून डिजिटल सार्वभौमत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘व्लाड्स ऍप’ आणि ‘मॅक्स’ सारखी स्वदेशी ऍप्स लाँच केली आहेत. हे ऍप्स सरकारच्या नियंत्रणाखाली असतील आणि रशियातील सर्व्हरवर डेटा साठवतील.
जगात वापरली जाणारी बहुतांश सोशल मीडिया ऍप्स अमेरिका किंवा इतर पाश्चिमात्य देशांशी जोडलेली असतात. अमेरिका आणि बहुतेक पाश्चिमात्य देश युक्रेनला लष्करी, आर्थिक आणि गुप्तचर सहाय्यासह मदत करत आहेत. आपले अधिकारी आणि नागरिकांनी या ऍप्सचा वापर केल्यास शत्रूंना गुप्तमाहिती मिळण्याचा हा सोर्स ठरू शकतो, अशी भीती पुतिन यांनी व्यक्त केली आहे. परदेशी मेसेजिंग ऍप्सवर नियंत्रण ठेवणे हे देशातील सरकारांच्या नियंत्रणात नाही. चीन, उत्तर कोरिया, इराण, सीरिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये व्हॉट्सऍपवर बंदी घालण्यात आली आहे.

