Homeलातूरअहमदपूर येथे मुख्याधिका-यांच्या खुर्चीस हार

अहमदपूर येथे मुख्याधिका-यांच्या खुर्चीस हार

अहमदपूर : प्रतिनिधी
शहरातील नागरी समस्यांचा डोंगर असतानाही प्रशासन निष्क्रीय अवस्थेत असल्याने त्याच्या निषेधार्थ मंगळवारी अहमदपूर नगरपालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्याधिका-यांच्या खुर्चीला हार घालून अनोख्या पद्धतीने गांधीगीरी करीत आपला तीव्र संताप व्यक्त केला. येथील नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा अशी प्रमुख मागणी आहे.
अहमदपूर शहरात सध्या कचरा, पाणी आणि रखडलेल्या विकासकामांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे परंतु या समस्या सोडविण्याऐवजी मुख्याधिकारी स्वत: कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला आहे. मुख्याधिकारी नगरपालिकेत वेळेवर उपलब्ध नसतात आणि ते मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य जनतेसह लोकप्रतिनिधींची कामेही खोळंबली आहेत. नाल्या कच-याने पूर्णपणे भरल्या आहेत. त्या उपसल्या नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन सातत्याने फुटत असल्याने पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी मुख्याधिकारी हे नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत आणि कोणत्याही कामासंदर्भात विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करतात.
याव्यतिरिक्त, नगरपालिकेची कामे करणा-या गुत्तेदारांना प्रशासन पाठीशी घालत असून, कामाचे पैसे मिळूनही गुत्तेदार मनमानी कारभार करीत आहेत. कामासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ गुत्तेदारांकडून पुरवले जात नसल्याने शहराची सर्व विकासकामे सध्या ठप्प झाली आहेत. ​या सर्व प्रकाराचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक मुख्याधिका-यांच्या दालनात गेले होते मात्र यावेळीही मुख्याधिकारी नेहमीप्रमाणे कार्यालयात गैरहजर असल्याचे दिसून आले. अधिका-यांच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी ‘जर अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसतील आणि समस्या सोडवत नसतील तर खुर्चीचा काय उपयोग?’ असा सवाल करीत त्यांच्या रिक्त खुर्चीलाच हार घालून प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
      यावेळी अ‍ॅड.निखील कासनाळे, अ‍ॅड. अजिंक्य चामे, राहूल शिवपुजे, सावंत कदम, हुसेन मनियार सर्व नगरसेक, दीपक शिंगडे, हनुमंत देवकत्ते, मुज्जू सय्यद, दीपक हालसे यांची उपस्थिती होती. मुख्याधिका-यांच्या या कार्यपद्धतीवर आता वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहमदपूर नगर परिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा अशी सर्वांची मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR