लातूर : प्रतिनिधी
भारत सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या महासाधना सप्ताह (२ मे ते १० मे २०२६) दरम्यान लातूर शहर महानगरपालिकेने संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २५० ते १४९९ कर्मचारी, अधिकारी नोंदणी असलेल्या १०१ कार्यालयांच्या गटात लातूर मनपाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या दैदीप्यमान यशाबद्दल दि. ८ मे रोजी, मुंबई येथील मंत्रालय मुख्य इमारतीतील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित टेक वारी २.० या विशेष कार्यक्रमात लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. साधना सप्ताह २०२६ हा उपक्रम सरकारी कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेत वाढ करून प्रशासकीय कामात गुणात्मक सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आला. यामध्ये देशातील ९३ हून अधिक केंद्रीय मंत्रालये, सर्व राज्ये आणि २०० हून अधिक प्रशिक्षण संस्थांनी सहभाग नोंदवला होता. या जागतिक स्तरावरील स्पर्धेत लातूर मनपाने आपले स्थान अधोरेखित केले आहे. या यशाबद्दल बोलताना आयुक्त श्रीमती मानसी आणि उपायुक्त पंजाब खानसोळे यांनी आनंद व्यक्त केला. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सिस्टिम मॅनेजर (ई-प्रशासन) प्रवीण इंगळे व त्यांच्या चमूच्या परिश्रमाबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त करून त्यांचे विशेष कौतुक केले.

