नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताने आता इतर देशांसोबत हात मिळवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांनी ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करारा’वर वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. मे महिन्यात सुरू झालेली ही चर्चा अवघ्या ७ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, यामुळे दोन्ही देशांतील वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला मोठी गती मिळणार आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोमवारी या कराराची माहिती दिली.
‘टॅरिफ वॉल’ कोसळणार : या करारामुळे न्यूझीलंडमधून भारतात येणा-या ९५ टक्के उत्पादनांवरील आयात शुल्क एकतर पूर्णपणे रद्द होईल किंवा लक्षणीयरीत्या कमी होईल. पुढील २० वर्षांत न्यूझीलंडची भारताला होणारी निर्यात वार्षिक १.१ अब्ज डॉलर्सवरून १.३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या करारामुळे न्यूझीलंडच्या कंपन्यांना भारतातील १४० कोटी ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
केवळ वस्तूच नाही, तर सेवा क्षेत्रातही दोन्ही देशांची पकड मजबूत आहे. भारत आयटी, सॉफ्टवेअर सेवा, दूरसंचार आणि आरोग्य सेवांमध्ये आघाडीवर आहे. तर न्यूझीलंडचा शिक्षण क्षेत्रात मोठा वाटा असून पर्यटन आणि फिनटेक क्षेत्रातही न्यूझीलंडची मोठी गुंतवणूक आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील द्विपक्षीय व्यापार सध्या १.३ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. न्यूझीलंडचे सरासरी आयात शुल्क केवळ २.३% आहे, तर भारताचे १७.८% आहे. या करारा मुळे ही तफावत दूर होईल.
















