शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासून अत्यंत दुरवस्था झालेल्या आरीमोड ते शिरूर अनंतपाळ रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर शनिवारी दुपारी सुरुवात झाली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निर्देशानुसार संबंधित कंत्राटदाराने प्रत्यक्ष काम सुरू केले. त्यामुळे प्रवासी, वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
आरीमोड, शिरूर अनंतपाळ, तळेगाव (दे.) तिपराळ, कानेगाव, सय्यदपूरमार्गे देवणीकडे जाणारा हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शिरूर अनंतपाळ शहराला जोडणा-या या प्रमुख रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. अनेक ठिकाणी रस्त्याची खडी उघडी पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. विशेषत: रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या होत्या. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनांचे नुकसान होत असून, प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती.
अखेर नागरिकांच्या मागणीची दखल घेत माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार संबंधित कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने या मार्गावरून प्रवास करणा-या वाहनधारकांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करून नागरिकांची समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल परिसरातील नागरिक, प्रवासी व वाहनधारकांनी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.
















