औसा : प्रतिनिधी
जलसमृद्ध अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या ७ गावांच्या एकात्मिक आणि सर्वांगीण विकासासाठी औसा पंचायत समितीत दि. २७ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी या गावांचा सर्वांगीण विकास करून त्यांना ‘सुजलाम सुफलाम’ बनवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या अभियानांतर्गत निवडलेल्या ७ गावांमध्ये सर्व शासकीय योजनांचा प्रभावी लाभ पोहोचविण्यासोबतच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. विकास आराखडा तयार करताना निधीची कोणतीही अडचण लक्षात न घेता व्यापक, सखोल आणि दूरदृष्टी ठेवून नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार पवार यांनी प्रशासनास दिले. यावेळी संभाव्य पाणीटंचाई आणि हवामान खात्याने वर्तविलेल्या कमी पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर औसा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जलसमृद्ध अभियानाच्या पहिल्या टप्प्यात या ७ गावांचा आदर्श विकास केल्यानंतर तालुक्यातील आवर्षणग्रस्त सुमारे ७० गावांमध्येही याच धर्तीवर विकास योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत प्रशासनाला स्पष्ट सूचना देताना या ७ गावांमध्ये सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर देण्यात आला तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गावांना भेट देणार असून, त्या वेळी ही गावे राज्यासाठी आदर्श (मॉडेल) म्हणून उभी राहावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी ‘सिल्क आणि मिल्क’ या संकल्पनेच्या माध्यमातून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण करण्याचा मानसही आमदार पवार यांनी व्यक्त केला. आधुनिक शेती, बाजारपेठेचा अभ्यास आणि शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर इतर गावांमध्येही हीच संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, तहसीलदार घनश्याम अडसूळ, लातूर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजी पाटील, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, उपसभापती अमोल पाटील, विधानसभा प्रमुख संतोष मुक्ता, सदाशिव जोगदंड यांच्यासह संबंधित ७ गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

