Homeलातूररेणापूरसह तालुक्यात उन्हामुळे जनजीवन विस्कळीत

रेणापूरसह तालुक्यात उन्हामुळे जनजीवन विस्कळीत

​रेणापूर : प्रतिनिधी
मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून एप्रिल महिन्याच्या अखेरीस  रेणापूर शहर आणि तालुक्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे आणि अस  उकाड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून, दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
​   सकाळी ९ वाजेपासूनच सूर्याची प्रखरता जाणवू लागते. दुपारी १२ ते ४ या वेळेत तर जणू आगीच्या ज्वाला अंगाला लागत असल्याचा अनुभव येत आहे. यामुळे अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ, बस स्थानक परिसर आणि वर्दळीचे रस्ते दुपारच्या वेळी पूर्णपणे शांत दिसत असून, जणू काही ‘अघोषित संचारबंदी’ लागू झाल्याचा भास होत आहे. ​केवळ ऊनच नाही, तर रात्रीच्या वेळीही उकाडा प्रचंड वाढला आहे. ग्रामीण भागात वीज कपातीचे संकट असल्याने नागरिकांना रात्रीची झोप घेणेही कठीण झाले आहे. घामाच्या धारा आणि गरम हवेमुळे अबालवृद्धांचे हाल होत आहेत. तसेच कडाक्याच्या उन्हामुळे शेतमजुरांनी कामाच्या वेळा बदलल्या आहेत. सकाळी लवकर कामावर जाऊन अकरा वाजेपर्यंत मजूर घराकडे परतत आहेत त्यामुळे  शेतीकामांवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे .
  वाढत्या तापमानाचा फटका मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही बसत आहे. तालुक्यातील पाणीसाठे आटत असल्याने वनपरिक्षेत्रातील वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे त्यामुळे पशु पक्षाचे हाल होत आहेत. ​येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, रेणापूरकर आता पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. उन्हापासून सुटका मिळविण्यासाठी नागरिक शहाळी, लिंबू सरबत, ऊसाचा रस आणि शीतपेयांकडे वळत आहेत. रसवंतीगृहांवर गर्दी पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR