मुरुड : वार्ताहर
हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र वितरणास गती देणे, कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रिया सुलभ करणे आणि नागरिकांची होणारी प्रशासकीय पिळवणूक थांबविणे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाज, लातूर जिल्ह्याच्यावतीने सोमवार दि. २९ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात प्रमाणपत्र वितरणास सुरुवात झाली आहे मात्र लातूर जिल्ह्यात ही प्रक्रिया अद्यापही अपेक्षित गतीने राबविण्यात येत नसल्याने मराठा समाजात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, त्या नागरिकांना कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळविताना विविध प्रशासकीय अडचणी, अतिरिक्त कागदपत्रांची मागणी, अनावश्यक विलंब आणि मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शासनाने ज्या पद्धतीने २ सप्टेंबर २०२५ रोजी कुणबी प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ केली, त्याच धर्तीवर कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रियेसाठीही स्वतंत्र शासन आदेश काढून प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मराठा समाजाने जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वितरण सुरू करणे, विभागीय आयुक्तांच्या ३ जून २०२६ च्या पत्राची काटेकोर अंमलबजावणी करणे, सर्व सेतू सुविधा केंद्रांना प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश देणे, विशेष कुणबी नोंद शोधमोहीम राबविणे, मराठा-कुणबी प्रकरणांसाठी स्वतंत्र विशेष कक्ष (स्पेशल सेल) स्थापन करणे, निश्चित कालमर्यादा ठरविणे तसेच दिरंगाई करणा-या अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जल्हिास्तरावर मराठा समाजाच्या प्रतिनिधींची समन्वय समिती स्थापन करून दर महिन्यास आढावा बैठक घेण्याबरोबरच, मराठा-कुणबी समाजाच्या प्रलंबित प्रकरणांबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करून सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दि. २९ जूनपासून सुरू होणा-या आमरण उपोषणापूर्वी शासनाने मागण्यांची दखल घेऊन निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच उपोषणादरम्यान उद्भवणा-या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सकल मराठा समाज, लातूर जिल्ह्याच्या वतीने उपोषणकर्ते गोविंदराव मगर पाटील (रा. रामेगाव, ता. लातूर) आणि अनिल गणपतराव बिरादार (रा. बटनपूर, ता. देणी) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
















