लातूर : प्रतिनिधी
दस-याचा सण, सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना लातूर तालुक्यातील खोपेगाव येथे दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता शेताच्या लगत असलेल्या महावितरणच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणगी थेट ऊसाच्या शेतात पडली. क्षणार्धात दोन शेतक-यांचा १० एकर डोलदार ऊस जळून खाक झाला. त्यामुळे या शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आधीच दुष्काळाने होरपळणारा शेतकरी, त्यात दस-याच्या दिवशीच वर्षभर जपलेले पीक डोळ्यासमोर जळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुदैवाने दस-याची सुट्टी असल्याने गावातील सर्व युवक गावातच होते. आगीची माहिती मिळताच युवकांनी जीवाची पर्वा न करता शेतात धाव घेतली आणि आग पसरू न देता विझवली. जर सुट्टी नसती तर आजूबाजूचा अनेक एकर सोयाबीन व ऊसही जळाला असता. अग्निशामक गाडी येईपर्यंत युवकांनीच संपूर्ण आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने अशा परिस्थितीत जोपासलेल्या ऊसाचे पिक जळून खाक झाले. त्यामुळे शेतक-यांच्या आगामी आर्थिक नियोजनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
















