जळकोट : प्रतिनिधी
पाटोदा ते कोळनूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी घसरून पडल्याने कोळनूर येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोविंद संभाजी पांचाळ (वय २३, रा. कोळनूर, ता. जळकोट, जि. लातूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
पाटोदा ते कोळनूर दरम्यान आपल्या दुचाकीने प्रवास करीत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर दुचाकी स्लीप होऊन, सदरील युवक गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचार करण्यासाठी उदगीर येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला . या प्रकरणी जळकोट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ नुसार २१ ऑक्टोबर २०२६ रोजी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार वाघमारे हे करीत आहेत.
















