शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
विजयादशमीस रावण दहनाची परंपरा असताना देशासमोरील ज्वलंत प्रश्नांचे प्रतीकात्मक रावण दहन करून शिरूर अनंतपाळ येथे महाविकास आघाडीने लक्षवेधी उपक्रम राबविला. यात भ्रष्टाचार, मतदानचोरी, पक्षफोडी, पेपरफुटी, महागाई, बेरोजगारी, जातीयवाद आणि हुकूमशाही या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
काँग्रेस नेते डॉ. अरविंद भातांब्रे यांच्या हस्ते प्रतीकात्मक रावण दहन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी देश आणि राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे असल्याचे सांगितले. शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असून, सत्तेचा वापर ठरावीक लोकांच्या हितासाठी होत असल्याची टीका त्यांनी केली. या समस्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केल्याची भूमिका आयोजकांनी सांगितली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज मठपती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हांद्राळे, गुरुनाथ अचवले, विश्वनाथ हांद्राळे, डॉ. वैभव हासबे, बाळासाहेब पाटील, आसिफ ऊजेडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रतीक पारशेटे, काशिनाथ धुमाळे, बालाजी बरबटले, विशाल गिलचे आदींसह युवक व नागरिक उपस्थित होते.
















