उदगीर : प्रतिनिधी
विक्रमी गाळप विक्रमी ऊस दर हे सूत्र कायम ठेवून विलास सहकारी साखर (तोंडार, उदगीर) च्या माध्यमातून शेतक-यांच्या उसाला प्रती टन ३२०० रुपयांपेक्षा अधिकचा ऊस दर देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी केली. उदगीर तालुक्यातील तोंडार येथे विलास सहकारी साखर कारखाना ऊस मोळी पूजन व गळीत हंगाम २०२६ चा शुभारंभ बुधवार दि. २१ ऑक्टोंबर रोजी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे, सर्व संचालक यांच्या उपस्थितीत दु्ष्काळी परिस्थितीच्या पाश्वभुमीवर अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.
यावेळी बोलताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, मागच्या काही वर्षात या कारखान्याने अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. कारखाना परिसरातील शेतक-यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी आर्थिक क्रांती घडवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे त्यामुळे या परिस्थितीत शेतकरी, मजूर कामगार या सर्वांना आधार देण्याची बांधिलकी हा कारखाना जपणार असल्याचेही या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले.
विक्रमी गाळप विक्रम ऊस दर हे या कारखान्याचे सूत्र राहणार असून दरवर्षीप्रमाणे हा कारखाना उत्कृष्ट कार्यक्षमतेतने चालवून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा प्रयत्न करणार आहे. मांजरा परिवाराची उसाला उच्चांकी दर देण्याची परंपराही हा कारखाना कायमस्वरूपी जपणार आहे. यामुळे मांजरा परिवाराने जाहीर केल्याप्रमाणे हा कारखाना गाळप उसाला प्रती टन पहिली उचल ३ हजार रुपये देणार आहे शिवाय या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करून उसाला प्रती टन ३२०० पेक्षा अधिकचा दर देण्याचा कारखान्याचा मानस आहे. यातून उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर तालुक्यात सर्वाधिक भाव देण्याची परंपरा हा कारखाना निश्चितपणे जपणार असल्याचेही याप्रसंगी त्यांनी सांगितले. आपण उत्पादित केलेल्या उसाला सर्वाधिक भाव मिळण्यासाठी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व ऊस पुरवठाधारकांनी विलास सहकारी साखर कारखाना, उदगीर या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहनही या वेळी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शेवटी केले.
या वेळी माजी आमदार तथा विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथ शिंदे, संचालक सर्वश्री रवींद्र काळे, नरसिंग बुलबुले, रसूल पटेल, अनंत बारबोले, हणमंत पवार, रणजीत पाटील, गोवर्धन मोरे, तात्यासाहेब पालकर, रामराव
साळुंके, अमृत जाधव, सतीश शिंदे (पाटील), लताबाई देशमुख, दीपक बनसोडे, शाम बरुरे, सुभाष माने, कार्यकारी संचालक आत्माराम पवार, शिवाजीराव हुडे, कल्याण पाटील, पद्माकर उगीले, मारुती पांडे, प्रीती भोसले, सिद्धेश्वर पाटील, संतोष बिरादार, विनोबा पाटील, पंडित ढगे, राजेंद्र पाटील, विजयकुमार चवळे, चंद्रकांत मद्दे, अनिल चव्हाण, माधव कांबळे आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
विलास साखर कारखाना युनिट-१ च्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ
लातूर तालुक्यातील वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट १ चे ऊस मोळी पूजन व गळीत हंगाम २०२६ चा शुभारंभ आज दि. २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांना अभिवादन
प्रारंभी लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस
मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते विलास सहकारी साखर कारखान्याच्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले.
















