लातूर : प्रतिनिधी
देशाची अंतर्गत सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखताना तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणा-या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे आज सकाळी ८ वाजता पोलीस स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातील कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या १५४ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका उपस्थित होते. दि. १ सप्टेंबर २०२५ ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालेल्या १५४ पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या बलिदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. या हुतात्म्यांमध्ये महाराष्ट्रातील पोलीस अंमलदार दीपक चिन्ना मडावी आणि नवलसिंग हवेल्या वसावे यांचाही समावेश आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पोलीस गार्डच्या वतीने हुतात्मा पोलिसांना शोक सलामी देण्यात आली. कर्तव्य बजावताना प्राणार्पण केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या नावांचे वाचन करून हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी शस्त्र सलामी देण्यात आली, हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली तसेच अंतिम सलामी अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. पोलीस गार्डचे नेतृत्व आरपीआय राठोड यांनी केले.यावेळी तांबे यांनी हुतात्मा पोलिसांचे बलिदान हे संपूर्ण पोलीस दलासाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले. देशसेवेचे व्रत स्वीकारून प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देणा-या हुतात्मा पोलिसांच्या कार्यातून प्रत्येक अधिकारी व अंमलदाराला जनतेच्या सेवेसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आदर्श जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक मेघना आय. एन., जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहरातील सर्व पोलीस निरीक्षक तसेच जिल्ह्यातील अन्य पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या पोलीस हुतात्म्यांचे शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून देशसेवेची भावना अधिक दृढ करणे आणि त्यांच्या आदर्शानुसार कर्तव्य बजावणे, हाच पोलीस स्मृतीदिनाचा मुख्य संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
















