बारडोलीजवळ महाराष्ट्रातील २ बसचा चक्काचूर
आगीत होरपळल्याने
५ प्रवासी गंभीर जखमी
सुरत : वृत्तसंसअथा
गुजरातमधील सुरतनजीक २ एसटी बसचा भीषण अपघात झाला. दोन्ही एसटी बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या होत्या. या अपघातात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही भीषण दुर्घटना मंगळवारी पाच ते सव्वापाचच्या सुमारास घडली. सुरतच्या बारडोली तालुक्यातील उवा गाव येथे हा अपघात घडला. दोन्ही बस समोरासमोर आल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात एका बसचा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तर दुसरी बस थेट पलटी झाली. त्यानंतर या बसला भीषण आग लागली. यामुळे अनेकांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सुरत ते धुळे मार्गावर धावणा-या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला मागून एका ट्रकने ठोकरल्याने ही बस रस्त्याचा दुभाजक ओलांडून शेजारी लेनमध्ये घुसली. त्याच वेळी त्याच मार्गावर जामनेर ते सुरत धावणा-या बसला धडक लागल्याने ही बस रस्त्याच्या खाली घसरून तिने पेट घेतला. दोन्ही बसेसच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बसचा चक्काचूर होऊन एका बसला आग लागल्याची घटना घडली.
बस क्रमांक एम.एच. १८ बीझेड १२५८ सुरत ते धुळे मार्गावर धावत होती. गुजरात हद्दीत व्याराजवळ ही बस आली असताना मागून येणा-या एका ट्रकने धडक दिली. त्यामुळे एसटी बस दुभाजक तोडून दुस-या बाजूला कलंडली. याचवेळी त्याच मार्गावर जामनेर ते सुरत धावणा-या बस क्रमांक एम. एच. २० बीएल ३३६० ला धडक बसली. त्यामुळे ही बस रस्त्याच्या खाली घसरून तिने पेट घेतला. या दोन्ही बसमधील चालकांचा मृत्यू झाला तर ५ ते ६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर चार ते पाच प्रवासी होरपळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजते.
चालकाचा मृत्यू
भीषण अपघातात जळगावच्या भुसावळ तालुक्यातील कु-हा पानाचे येथील चालकाचा मृत्यू झाला. घनश्याम राघो बरकले असे मृत्यू झालेल्या ४२ वर्षीय बस चालकाचे नाव आहे. अपघातग्रस्त बस क्रमांक एमएच २० बीएल ३३९० ही जामनेर आगाराची होती. यावरील चालक मृत्युमुखी पडला.
बचावकार्य युद्ध पातळीवर
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बसला आग लागल्यामुळे गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना तातडीने बारडोली येथील रुग्णालयात दाखल केले.
मृतदेहांची ओळख पटेना
या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त करीत मृतांच्या वारसदारांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान, या भीषण अपघातातील मृतदेह जळाल्याने त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्यांचे डीएनएचे नमूने घेण्यात येणार आहेत.
















