सोलापुरात भाजपची खेळी, फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद
सोलापूर : प्रतिनिधी
राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज अखेर छाननीदरम्यान अवैध ठरवून बाद करण्यात आला. सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कायदेशीर पडताळणीनंतर निर्णय घेतला. काँग्रेसकडून सूचक म्हणून अर्ज केलेल्या व्यक्तीने घेतलेल्या हरकतीमुळे पक्षाच्या उमेदवारावर ही नामुष्की ओढावली आहे.
मित्र समजून ज्याच्या खांद्यावर डोके ठेवले, त्याने केसाने गळा कापला, अशी प्रतिक्रिया देताना काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर भावूक झाल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपचे राजेंद्र राऊत, शरद पवार राष्ट्रवादीकडून वसंत देशमुख, नागेश अक्कलकोटे, जीवन जानकर, धनंजय डिकोळे, महेश साठे, रमेश बारसकर यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला. सोलापूर विधानपरिषदेसाठी एकूण ७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
तत्पूर्वी, ही भाजपाची खेळी असल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासमोर भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, भाजपा महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार रमेश बारसकर यांनी आक्षेप घेतला. परंतु जिल्हाधिका-यांनी हा आक्षेप फेटाळला.
सूचकाच्या एका
हरकतीने गेम उलटला
काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होण्यामागे एक नाट्यमय घडामोड कारणीभूत ठरली. फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नागेश भोसले यांचे नाव आणि स्वाक्षरी होती. मात्र, छाननीच्या वेळी नागेश भोसले यांनी अचानक निवडणूक अधिका-यांकडे धाव घेत या अर्जावरील सही माझी नाही, असा खळबळजनक आक्षेप घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन घेतलेली हरकत आणि पुरावे ग्रा धरून कॉंग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरवला. त्यामुळे कॉंग्रेसला धक्का बसला.
















