Homeराष्ट्रीयमहागाईचा भडका

महागाईचा भडका

पेट्रोल, डिझेल ३ रुपयांनी महागले
नवी दिल्ली : इराण-अमेरिका युद्धानंतर पेट्रोल, डिझेल, गॅस पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत गेल्याने आणि सातत्याने रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने अखेर पंतप्रधान मोदी यांनी आज पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर तब्बल ३ रुपये वाढ करून महागाईचा बॉम्ब फोडला. आधीच गॅस सिलिंडरचे दर वाढविण्यात आले होते. आज पेट्रोल, डिझेलची दरवाढ केल्याने महागाईचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांचे जगणे आता कठीण होणार आहे. कारण पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे प्रवासासोबत आता सर्वच वस्तू महागणार आहेत.

मध्य-पूर्वेतील तणावाचा भारतावर मोठा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे १ मे नंतर गॅस सिलिंडरपासून पेट्रोल आणि डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या. तसेच काही जीवनावश्यक वस्तूंच्याही किमती वाढल्या. मुळात पेट्रोल, डिझेलच्या दरावरच सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आता इंधन दरात वाढ झाल्याने वाहतूक भाडे, प्रवास खर्च वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना फार मोठा झटका बसला आहे.

केंद्र सरकारने काल साखर निर्यातीवरील बंदीबाबत मोठा निर्णय घेतला आणि आज लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या भावात ३ रुपयांनी वाढ केली. त्यामुळे आता टॅक्सीचालक आणि रिक्षाचालकांनीही भाडेवाढ करण्याचे संकेत दिले. या आधी १ मे रोजी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ९९३ ने वाढ केली. या दरवाढीमुळे मुंबईसह अनेक शहरांमध्ये किमती ३ हजारांच्या आसपास आहेत. यासोबतच सीएनजीच्या दरातही वाढ केली. त्यातच दुधाच्या दरातही वाढ झाली आहे. याशिवाय सोन्यावरील आयात शुल्कही वाढविण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोक्यावर महागाईचा भस्मासूर बसला आहे.

महागाई मॅन मोदी
देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली. तसेच सीएनजीच्या किंमतीतही २ रुपयांनी वाढ झाली. यावरून काँग्रेसने सत्ताधा-यांवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक खर्चाच्या वसुलीसाठी महागाई मॅन मोदींनी जनतेवर आज चाबूक चालवला, अशी टीका काँग्रेसने केली. निवडणुका संपल्या आणि मोदींची वसुली सुरू झाली, अशी टीका काँग्रेसने केली.

डिलिव्हरी होणार ठप्प?
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींविरोधात देशभरातील गिग कामगारांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार शनिवार, दि. १६ मे रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत लाखो डिलिव्हरी पार्टनर आणि कॅब चालक त्यांचे अ‍ॅप्स बंद करून संपावर जातील. त्यामुळे स्विगी, झोमॅटो, ब्लिंकइट, झेप्टो, ओला, उबर आणि रॅपिडो कंपन्यांच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR