कृष्णप्रकाश अपर पोलिस महासंचालक, सातपुतेंना बढती
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने शुक्रवारी एकाचवेळी तब्बल ९६ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. बदली झालेल्या अधिका-यांमध्ये भारतीय पोलिस सेवेतील ५२ तर राज्य पोलिस सेवेतील ४४ अधिका-यांचा समावेश आहे. बोगस कॉल सेंटर प्रकरणात आरोप झालेले नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी झाली. फोर्स वनचे अपर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांची अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण) पदावर बदली झाली. तसेच खरात प्रकरणाचा तपास करणा-या आयपीएस तेजस्वी यादव यांची पुण्याच्या गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्तपदी बढती मिळाली.
गृह विभागाच्या आदेशानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशिक्षण प्रवीण पडवळ यांची विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे तर मुंबईचे सहपोलिस आयुक्त गुन्हे लखमी गौतम यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) मुंबई या पदावर बदली करण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य मनोज शर्मा यांची पोलिस सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था, विशेष पोलिस महानिरीक्षक (नियोजन आणि समन्वय) महाराष्ट्र राज्य सुवेझ हक यांची पोलिस सहआयुक्त (प्रशासन) मुंबई या पदावर नेमणूक करण्यात आली. अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई महेश पाटील यांना विशेष पोलिस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) महाराष्ट्र राज्य या पदावर पदोन्नतीने नियुक्ती केली. मुंबईचे अपर पोलिस आयुक्त परमजीत दहिया यांना विशेष पोलिस महानिरीक्षक (दहशतवादविरोधी पथक) या पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली.
विशेष पोलिस महानिरीक्षक (दहशतवादविरोधी पथक) सी. के. मीना यांना विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र या पदावर बदली झाली. विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांची पोलिस सहआयुक्त, पुणे या पदावर बदली झाली. पोलिस सहआयुक्त, पुणे रंजन शर्मा यांना विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र या पदावर नेमण्यात आले तर विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, सुनील फुलारी यांची बदली विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) या पदावर करण्यात आली.
राजेश प्रधान यांना पोलिस सहआयुक्त आर्थिक गुन्हे, मुंबई या पदावर तर पोलिस सहआयुक्त आर्थिक गुन्हे, मुंबई निशिथ मिश्रा यांना विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशिक्षण या पदावर, पोलिस सहआयुक्त प्रशासन, मुंबई जय कुमार यांना विशेष पोलिस महानिरीक्षक फोर्स वन या पदावर बदली करण्यात आली. पोलिस सहआयुक्त, नवी मुंबई संजय येनपुरे यांना विशेष पोलिस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा या पदावर नियुक्त करण्यात आले.

