शिर्डी : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध होत नाहीत, अशी उगाचच आवई उठवली जाते. चित्रपट यशस्वी होण्यासाठी तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते, असे मत अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. चित्रपट उद्योगात अनेकदा हिंदी चित्रपटांच्या प्रभावामुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जातात. मात्र, ‘देऊळ बंद २’च्या बाबतीत असे घडले नाही, असा अनुभव प्रवीण तरडे यांनी शेअर केला.
मराठवाड्यातील आमदार आणि खासदारांनी ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट शेतक-यांच्या प्रबोधनासाठी दाखवावा, असे आवाहनही प्रवीण तरडे यांनी केले. तुम्ही मतदारांना भुलवण्यासाठी लाखो रुपये खर्च करता. मात्र, त्यासाठी ते जिवंत राहिले पाहिजेत. ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट आम्ही केवळ व्यावसायिक नफा कमावण्याच्या दृष्टीने बनवलेला नाही. या चित्रपटातून राज्यातील शेतक-यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
राज्यकर्त्यांनीही हा चित्रपट तळागाळापर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘देऊळ बंद २’ चित्रपट दर्जेदार असल्याने प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. उलट त्याकाळात दिग्दर्शक करण जोहर यांचे दोन चित्रपट चालले नसल्याचे अभिनेते प्रवीण तरडे यांनी सांगितले. मी येथे ना तक्रार करायला आलो आहे, ना आनंद साजरा करायला. आम्ही कुठं आंदोलनं केली नाहीत. कुठं भांडायलाही गेलो नाही. चित्रपट हा एक व्यवसाय आहे. त्यात भावना आणू नयेत. चांगले चित्रपट निर्माण करायचे आणि त्यासाठी चांगली थिएटर्स मिळवायची एवढेच आमचे उद्दिष्ट आहे, असे सांगत प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याचे सांगणा-यांना चपराक दिली.
चित्रपटाचे निर्माते कोपरगावचे सुपुत्र कैलास वाणी आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या महाराष्ट्रभर फिरून चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक कोटी रुपयांचा गल्ला कमावला असून, या माध्यमातून शेतकरी कुटुंबांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा मानस निर्मात्यांनी व्यक्त केला.
















