पुणे : प्रतिनिधी
आगामी १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकारांना ही माहिती सांगितली. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी महामंडळ समितीने तीन जागांची पाहणी केली. त्यानंतर रविवारी झालेल्या महामंडळाच्या बैठकीत पुणे विद्यापीठात संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळ आयोजक असून समर्थ युवा फाऊंडेशन संमेलनाचे संयोजन करणार आहे. पुण्यात होणारे हे १४ वे संमेलन असणार आहे. दि. २८ रोजी संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
‘नांदी १०० व्या साहित्य संमेलनाची’ असा उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात येणार आहे असे नमूद करून ते म्हणाले, महाराष्ट्रात जेथे जेथे मराठी साहित्य संमेलन झाले तेथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ज्यायोगे शंभरावे साहित्य संमेलन हे वैविध्यपूर्ण व्हावे असा प्रयत्न करण्यात येणार आहे.
आजवर ९९ साहित्य संमेलने पार पडली त्याचा इतिहास सांगण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे.साधारणपणे दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी होणारा खर्च हा महाकोषामधून करण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नियोजित संमेलनाचे स्वरूप नक्की करण्यासाठी आगामी महामंडळ बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या पत्रकार परिषदेला महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
















