26 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeसंपादकीय विशेषतिसरा टप्पा निर्णायक!

तिसरा टप्पा निर्णायक!

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या २ टप्प्यांत देशातील १९१ मतदारसंघात मतदान पार पडले असून पुढच्या आठवड्यात आणखी ९४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यात राज्यातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. हे मतदारसंघ बघता लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा व निर्णायक असेल, असे दिसतेय. तिस-या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या ९४ मतदारसंघांपैकी ७२ जागा भाजपने जिंकल्या होत्या तर केवळ २ जागांवर काँग्रेसला यश मिळाले होते. यावरून हा टप्पा भाजपसाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. थोडक्यात हा गणिताचा पेपर आहे त्यामुळे या परीक्षेच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाने अधिक वेळ दिला असावा. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला ५ मतदारसंघात तर दुस-या टप्प्यात २६ एप्रिलला ८ मतदारसंघांत मतदान झाले.

सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या सर्व टप्प्यांमध्ये ५ ते ६ दिवसांचे अंतर आहे मात्र दुस-या व तिस-या टप्प्यात ११ दिवसांचा कालावधी प्रचाराला मिळाला आहे. हा योगायोग असेल; पण उपलब्ध वेळेचा सर्वच राजकीय पक्षांनी पुरेपूर वापर करून घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातील वर्दळ वाढली आहे. त्यांच्या सभांची संख्या वाढवण्यात आलीय. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती फारशी अनुकूल नाहीय हे बहुदा त्यांच्या लक्षात आले असावे. भाजप हा सर्वेक्षणावर काम करणारा पक्ष आहे. वेगवेगळ्या संस्थांनी दिलेल्या अहवालानुसार त्यांनी मित्रपक्षांचे मतदारसंघ काढून घेतले. त्यांचे उमेदवार बदलायला भाग पाडले. आपलेही काही उमेदवार बदलले.

मुंबईतील सर्व ३ विद्यमान खासदारांना घरी बसवून नवे गडी रिंगणात उतरवले आहे तरीही किती फायदा होईल याबद्दल त्यांच्याच मनात शंका दिसतेय. २०१४ ला देशात मोदी लाट होती. २०१९ च्या निवडणुकीत बालाकोट, पुलवामा, सर्जिकल स्ट्राईक यामुळे देशप्रेमाची लहर होती. या वेळी अशी कोणतीच लाट दिसत नाहीय त्यामुळे देशातील स्थिती चारशे पार जाऊ दे ‘बेडा पार’ तरी करणार का? अशी चिंता अनेकांच्या चेह-यावर दिसतेय. महाराष्ट्रातील स्थिती सत्ताधा-यांना आणखी चिंतेत टाकणारी असल्याने आपली सगळी शक्ती पणाला लावण्याचे धोरण ठरवलेले दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात सभा होतायत. अमित शाह ही प्रत्येक जिल्ह्यात जातायत. कोणत्या पक्षाने किती सभा घ्यायच्या, कोणाला प्रचाराला बोलवायचे हा त्यांचा अधिकार आहे. दुस-याला त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाहीय; पण यावरून महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा भाजपला यावेळी तेवढी सोपी नाहीय, हे तरी स्पष्ट दिसते आहे.

तिस-या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ मतदारसंघांत मतदान होणार आहे. २०१९ ला यातील बारामती, रायगड व सातारा वगळता सर्व जागा भाजप – शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रायगडचे तटकरे महायुतीत गेले तर ओमराजे निंबाळकर आणि विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याच सोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज महायुतीकडे ८ तर महाविकास आघाडीकडे ३ जागा आहेत. ‘अब की बार ४५ पार’चा नारा देताना या ११ पैकी किमान १० जागा जिंकू, असा दावा भाजप नेते करीत होते; पण झपाट्याने बदललेल्या राजकारणामुळे सर्वच मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक होत असून, महायुतीचे गणित या टप्प्यात आणखी बिघडणार की काय? अशी शंका व्यक्त होते आहे.

मोहिते पाटलांनी राजकारणाचा पट फिरवला
मोहिते पाटील घराणे कायम काँग्रेसी विचारधारेसोबत राहिले आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. २०१४ ला राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपने पक्षाच्या विस्तारावर लक्ष केंद्रीत केले. महाराष्ट्रातील बराच भाग असा आहे की, जेथे आपण कितीही प्रयत्न केले तरी आपली मुळं रुजू शकत नाहीत याची जाणीव भाजपला होती त्यामुळे तिथल्या आपल्या कार्यकर्त्याला बळ देऊन नवे नेतृत्व उभे करण्याच्या दीर्घकालीन योजनेपेक्षा काँग्रेस – राष्ट्रवादीतील तयार नेते आयात करण्याचे धोरण भाजपने स्वीकारले. मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, मधुकरराव पिचड यांच्यासह अनेक नेत्यांना याशिवाय विरोधी पक्षातील पन्नास एक आमदार, माजी आमदारांना भाजपात सहभागी करून घेतले. याचा लगेच फायदाही झाला. आजही पक्षाचे तेच धोरण आहे. दोन पक्ष फुटून सोबत आल्यानंतरही काँग्रेसमधील बड्या नेत्यांना सोबत आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. आणखी कोणाची साथ सोडून सोबत आलेले लोक भविष्यात आपलीही साथ सोडून जाऊ शकतात हे त्यांनी लक्षात घेतले नसावे. मोहिते पाटील यांनी याची जाणीव त्यांना दिलीय.

सोलापूर व पुणे शहराचा अपवाद वगळता पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात अन्य पक्षांतील लोकांना सोबत घेऊन भाजपने आपला विस्तार केला. सोलापूर जिल्ह्यात विजयसिंह मोहिते, सांगली जिल्ह्यात संजयकाका पाटील, साता-यात उदयनराजे व शिवेंद्रराजे भोसले यांना सोबत घेतले. यामुळे सोलापूर, माढा, सातारा, सांगली, या मतदारसंघात त्यांना फायदा झाला; पण आता राजकीय रागरंग बदलले आहेत. भाजपने मोहिते पाटलांच्या विरोधाची पर्वा न करता माढा मतदारसंघातून पुन्हा रणजित निंबाळकरांना उमेदवारी दिली. परिणामी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला. धैर्यशील मोहिते पाटील माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मोहिते पाटलांच्या निर्णयाचे सोलापूर व सातारा मतदारसंघातही परिणाम दिसणार आहेत. भाजपसोबत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला हातकणंगले, कोल्हापूर, टिकवता येणार की नाही याबद्दल शंका आहे. अजित पवार गट बारामती, रायगड आणि धाराशिवची जागा लढतोय. तिन्ही ठिकाणी लढत आहे. स्वत: अजित पवार बारामतीत अडकून पडले आहेत. राजकारणातला कलह कुटुंबात नेण्याचा निर्णय घेऊन ते एकाकी पडले आहेत. बारामतीसाठी एवढी प्रतिष्ठा पणाला लावण्याची गरज होती का? असा सवाल आता त्यांचेच लोक विचारायला लागले आहेत. पहिल्या २ टप्प्यांमध्ये मतदान झालेल्या १३ जागांपैकी केवळ चंद्रपूरची मागच्या वेळी विरोधकांना मिळाली होती तर तिस-या टप्प्यात मतदान होत असलेल्या ११ पैकी ३ जागा विरोधकांकडे होत्या. या २४ जागांपैकी २० जागा महायुतीकडे होत्या. हे संख्याबळ या वेळी घसरेल. अशी स्पष्ट चिन्हं आहेत. ही घसरण किती मोठी असणार यावर लोकसभेचे आकडेच नाही तर पुढील काळातील महाराष्ट्राचे राजकारण व अनेक नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे.

भाजपाने मुंबईतील तिन्ही खासदार बदलले
२०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजप – शिवसेनेने मुंबईतील सर्वच्या सर्व ६ जागा जिंकल्या होत्या. या वेळी राजकारणात खूप बदल झालाय. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहेत व ४ जागा लढवतायत. भाजपही महायुतीत कदाचीत ४ जागा लढवेल, अशी चिन्हं आहेत. भाजपने मुंबईतील तीनही विद्यमान खासदारांना सुटी दिलीय. गोपाळ शेट्टी व मनोज कोटक यांची तिकिटं आधीच कापली होती. काल पूनम महाजन यांच्या जागेवर विख्यात वकील उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केली. पूनम महाजन यांचा जनसंपर्क कमी झाला होता. मतदारसंघात संपर्क नव्हता, अशी कारण सांगितली जातात. आता उज्ज्वल निकम व काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत होणार आहे. उज्ज्वल निकम यांचा या मतदारसंघाचा दुरान्वये संबंध नाही त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पूर्णत: स्थानिक भाजप नेत्यांना उचलावी लागणार आहे. मग ही जबाबदारी पूनम महाजन यांनी घेतली असती तर जमले नसते का? निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या या प्रश्नाला नेतेमंडळी काय उत्तर देतात ते बघावे लागेल.

पवारांची गुगली
बदलत्या राजकारणामुळे व जागावाटपात भाजपने केलेल्या दांडगाईमुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत असलेल्या आमदारांमध्ये चुळबूळ वाढली आहे. शरद पवार यांनी मागच्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना या अस्वस्थ मंडळींसाठी घरवापसीचा पर्याय असल्याचे सांगत गुगली टाकली आहे. या देशाची सत्ता पुन्हा भाजपच्या हातात जाणे देशहिताचे नाही. भाजपसोबत जायचं नाही ही आपली भूमिका या आधीही होती आणि या पुढेही राहिल त्यामुळे सोडून गेलेले सहकारी भाजपची साथ सोडून परत येणार असतील तर त्यांना परत घेण्याला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. निवडणूक रंगात आलेली असताना त्यांनी परतीचे दरवाजे बंद केलेले नसल्याचे सांगून प्रतिपक्षात गोंधळ उडवून दिला आहे. अजित पवार यांनी लगेच निवडलेला मार्ग बदलणार नाही, असे सांगून गोंधळ वाढणार नाही याची काळजी घेतली; पण मेसेज पोहोचला आहे.

-अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR