नांदेड : प्रतिनिधी
शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या जाचाला कंटाळून हिमायतनगरातील एका प्राथमिक शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह गोदावरी नदीत कार घालून घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी मयताच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून हदगावच्या बीडीओंसह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हिमायतनगरातील पोटा बु. येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील नारायण मोरे हे शिक्षण विभागातील अधिका-यांकडून होणा-या मानसिक जाचामुळे गेल्या काही दिवसांपासून तनावात होते. अखेर १७ जुलै रोजी सकाळी पुणेगाव ते आमदुरा दरम्यान असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावरून सुनील मोरे यांनी आपली मुलगी सारा (वय १४) आणि मुलगा सुमीत (वय १०) या दोघांना सोबत कार थेट नदी पात्रात घातली. यात तिघांचा जागीच अंत झाला. दरम्यान आपण वरिष्ठ अधिका-यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असलेल्या मजकुर लिहून तो मोबाईलच्या स्टेटसला ठेवला होता.
यामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मृत शिक्षक सुनील मोरे यांचे वडील नारायण मोरे रा. भोकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेडग्रामीण पोलिसांनी किसन फोले गटशिक्षण अधिकारी, हदगाव, सूर्यकांत बाचे विस्तार अधिकारी, हदगाव, शिवाजी कदम केंद्र प्रमुख व दत्ता विश्वंभर पवळे या चौघांविरूध्द मोरे यांना त्यांच्या दोन मुलासह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर हे अधिक तपास करत आहेत.
















