नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता संपूर्ण देशातून प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे. सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून लोक, विशेषत: तरुण वर्ग मोठ्या संख्येने देशाची राजधानी दिल्लीच्या दिशेने रवाना होत आहे.
नुकताच या प्रवासादरम्यानचा एक रेल्वेमधील व्हीडीओ समोर आला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या दिशेने रेल्वेतून त्यांचे समर्थक जाताना दिसत आहेत. या प्रवासात तरुण रेल्वे प्रवासात अत्यंत उत्साहाने आणि जोशात देशभक्तीपर गाणी म्हणत असल्याचे व्हीडीओमध्ये दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेतले होते. त्यांची प्रकृती पाहता त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंदोलकांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता हे आंदोलन अधिकच पेटण्याची आणि उग्र रूप धारण करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
लढा तीव्र होणार
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असले तरी मोठ्या प्रमाणात लोक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. अभिजित दीपके यांनी आम्ही आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच जेथे असाल तेथे आंदोलन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
















