जळकोट : ओमकार सोनटक्के
सध्या हिवाळा आहे की उन्हाळा हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे कारण प्रचंड उष्णता वातावरणामध्ये आहे. अंगाची लाही लाही होत आहे, अशा परिस्थितीत बांधावरील गवतदेखील वाळून जात आहे. या परिस्थितीमध्ये जळकोट तालुक्यातील अनेक शेतकरी आपले गाय वर्गीय जनावरे तसेच म्हैस, शेळ्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात घेऊन जात असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील २७ हजार ३६४ जनावराच्या चा-या प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना अशा दुष्काळामध्ये कसे सांभाळायचे असा प्रश्न शेतक-यांपुढे उभा टाकलेला आहे .
जळकोट तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तालुक्यातील जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. जळकोट तालुक्यामध्ये २७ हजार ३६४ जनावरे आहेत. यामध्ये गाय वर्गीय १७७०, म्हैस १०४११, मेंढ्या ३४०७, शेळ्या ६११७ अशी आकडेवारी आहे. आता या जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनणार आहे . जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी शेतक-यांनी खरीप हंगामात ज्वारीची पेरणी केली नाही यामुळे जनावरांसाठी कडबा उपलब्ध नाही , तसेच सोयाबीन ची गुळी व तुरीची गुळी याचा वापर चारा म्हणून शेतकरी करत असत परंतु यावर्षी सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे या सोबतच गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे तुरीचा देखील खराटा होत आहे . यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होणे अशक्य प्राय होऊन बसले आहे .
सध्या जळकोट तालुक्यामध्ये डिसेंबरअखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा आहे. यामुळे प्रशासनाच्या वतीने सध्या चा-याचे नियोजन सुरू झाले आहे. जळकोट तालुक्यामध्ये सध्या १९ हजार मेट्रिक टन एवढा चारा शिल्लक आहे. जळकोट तालुक्यामध्ये चा-याचे नियोजन करण्यासाठी चार हजार किलो मका बियाणे वाटप करण्यात आले आहे. हे बियाणे शेतक-यांना देण्यात आले असून हे मका बियाणे पेरून जनावरांसाठी चारा उपलब्ध केला जाणार आहे.
















