नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागांत थंडीचा जोर वाढला असून, त्याचा थेट परिणाम आता विमान वाहतुकीवर होऊ लागला आहे. खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे प्रसिद्ध विमान कंपनी ‘इंडिगो’ने तब्बल ५७ उड्डाणे रद्द केली आहेत. अचानक विमान फे-या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, विमानतळांवर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, विविध शहरांमधील खराब हवामानाचा अंदाज घेऊन सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी देखील जवळपास १३ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये काही तांत्रिक कारणांचा समावेश असला, तरी मुख्यत्वे धुक्यामुळे कमी झालेली दृश्यमानता हेच यामागील प्रमुख कारण असल्याचे कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर स्पष्ट केले आहे.
रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये मुंबईसह पुणे, दिल्ली, चंदीगड, अहमदाबाद, हैदराबाद, अमृतसर, बेंगळुरू, कोलकाता, चेन्नई आणि जयपूर यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. विशेषत: लांब पल्ल्याच्या आणि पहाटेच्या उड्डाणांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर विमान कंपनीच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या धुक्याच्या पार्श्वभूमीवर विमानन नियामक संस्था नागरी विमान वाहतूक संचालनालय सतर्क झाली आहे. १० डिसेंबर ते १० फेब्रुवारी हा काळ अधिकृतपणे ‘धुक्याचा काळ’म्हणून घोषित करण्यात आला आहे.
















